‘अच्छे दिन आने वाले है’
By Admin | Published: May 30, 2014 11:34 PM2014-05-30T23:34:30+5:302014-05-31T00:26:25+5:30
अण्णा हजारे : मोदी सरकारवर ठेवणार लक्ष!
अहमदनगर : काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, केंद्रातील स्पष्ट बहुमतातील सरकार, नरेंद्र मोदी सरकारने दाखविलेले प्रगतीचे स्वप्न आणि काळ्या पैशांविरुद्ध उचललेले पहिले पाऊल या देशाच्या राजकारणातील घडामोडींवर भाष्य करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे काहीसे सुखावले आहेत. ‘अच्छे दिन आनेवाले है’ ही त्यांची प्रतिक्रिया बोलकी ठरावी. मोदी सरकारला कामसाठी काही काळ देण्यासोबतच त्यांच्यावर ‘लक्ष’ ठेवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच अण्णांनी नव्या सरकारचे औपचारिक स्वागत केले होते, एवढेच नव्हे तर मोदी सरकारला शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, त्यांनी प्रथमच या सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक करताना काँग्रेसच्या पराभवावरही टीका केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथमच देशातील या बदलांवर सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणतात, या नव्या सरकारने सामान्य माणसांना प्रगतीचे स्वप्न दाखविले आहे. त्यासाठी त्यांना काही वेळ दिलाच पाहिजे. या काळात त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. मात्र आगामी चार-सहा महिन्यांत जनतेला दिलेला शब्द पाळण्यात केंद्रातील सरकार अपयशी ठरल्यास पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांविरुद्ध ‘असली आझादी अभियान’च्या माध्यमातून मोहीम उघडली जाईल.’ स्पष्ट बहुमत हे देशाच्या स्थिरतेसाठी उत्तम ठरेल. यामुळे विकासाला चालना मिळेल, असे सांगतानाच ‘मोदींच्या विजयात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा, जनतेला जिंकणारे त्यांचे वक्तृत्व आणि काँग्रेसचे अपयशी सरकार कारणीभूत ठरले,’ असे विश्लेषण ते मांडतात. काळ्या पैशाच्या तपासासाठी एसआयटीचे गठण आणि मंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांची आपल्या कार्यालयात नेमणूक न करण्याच्या निर्णयांचेही त्यांनी स्वागत केले आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारला आपलेच मंत्री विविध घोटाळ्यात अडकल्याने असे काही करावे, हे सुचलेच नाही. त्याची किंमतही त्यांना चुकवावी लागली, अशी टीका त्यांनी केली. रोज उघड होणारे घोटाळे, वाढत जाणार्या महागाईने सामान्य जनता पिचली होती. तिने आपला राग मतयंत्रातून व्यक्त केला. जनतेला घराणेशाही नकोच होती. म्हणूनच ‘माँ-बेटा आणि आता बेटी’चा पक्ष रसातळाला पोहचला, अशा शब्दात त्यांनी सोनिया गांधी-राहुल गांधी यांचे नाव न घेता टीकेची तीव्रता वाढविली. अरविंद केजरीवालांवर टीका करताना अण्णा म्हणतात, त्यांना दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून चांगली संधी मिळाली होती. चांगला कारभार करुन ‘विकासाचे नवे मॉडेल’ मांडण्याची संधी होती. मात्र फाजिल आत्मविश्वासात ते पंतप्रधान होण्यास निघाले होते. आता त्यांना पश्चाताप होतोय, पण त्याचा काय उपयोग? पुरावे असल्याशिवाय आरोप करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला़