गाजराच्या शेतीतून मिळते चांगली कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:36+5:302021-02-16T04:21:36+5:30
अकोले : तालुक्यातील गणोरे हे अवर्षण प्रवण क्षेत्रातील कोरडवाहू शेतीचे गाव. देवठाण धरण आणि विहिरी याच्या आधारावर आठमाही शेती ...
अकोले : तालुक्यातील गणोरे हे अवर्षण प्रवण क्षेत्रातील कोरडवाहू शेतीचे गाव. देवठाण धरण आणि विहिरी याच्या आधारावर आठमाही शेती केली जाते. अवघा ४०० ते ५०० मिलिमीटर पाऊस या भागात पडतो. परंतु या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गणोरे येथील तुकाराम दातीर या अल्पभूधारक शेतकऱ्यांने गाजराची शेती फुलवली आहे.
वडिलोपार्जित सुमारे २ एकर निमबागायती-कोरडवाहू शेती त्यांचा जीवन चरितार्थ चालवण्याचा आधार आहे. पारंपरिक शेतीतून येणारे उत्पन्न हे शाश्वत नसल्याने व उत्पादन खर्च डोईजड होत असताना शेतीवर कुटुंब चालवणे त्यांना अवघड जाऊ लागले. त्यावर पर्याय म्हणून गेली ५ वर्ष त्यांनी गाजर शेतीचा प्रयोग आपल्या शेतावर राबवला आणि तो कमालीचा यशस्वीही ठरला आहे. त्यांची गाजर शेती या भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. दातीर दाम्पत्य गेली ३९ वर्षांपासून शेती व्यवसाय करतात. यापूर्वी ते पारंपरिक पिके बाजरी, मका, गहू, हरभरा, इत्यादी घ्यायचे. परंतु या पिकांना मिळणारा बाजार भाव व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ दिवसेंदिवस बसवणे त्यांना अवघड जाऊ लागले. त्यातून त्यांनी वेगवेगळ्या पिकांचा पर्याय तपासायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात पूर्वीपासून परिसरातील गावांमध्ये गावठी गाजराची शेती पहिल्यापासून केली जायची. त्यानंतर बाजारात मागणी असलेली गाजराचे बियाणे त्यांनी स्थानिक कृषी केंद्रातून उपलब्ध करून घेतले. शेतीमध्ये मिळणारे उत्पन्न आणि गाजराच्या पाल्यापासून दुधाळ जनावरांना मिळणारा चारा हा दुहेरी फायदा त्यांना आकर्षित करून गेला. त्यानंतर त्यांनी गाजर शेतीसाठी दरवर्षी २० गुंठे क्षेत्र ठेवण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी गाजर शेतीचा प्रयोग आपल्या शेतावर सर्वप्रथम वर्ष १९९० मध्ये राबवला. त्यावर्षी त्यांना गाजराला बऱ्यापैकी भाव मिळाला व खर्च वजा जाता एकरी २० हजार रुपये उत्पन्न मिळाले. चालू हंगामातही त्यांनी गाजराची शेती २० गुंठे क्षेत्रावर फुलवली आहे. गाजराचा मधूबन हा ज्ञान संस्थेचा अहमदाबाद येथील वाण त्यांनी ११ नोव्हेंबर २०२० रोजी पेरणी केला आहे. एकरी सुमारे दोन किलो बियाणे याप्रमाणे त्यांनी पेरणी केले आहे. अत्यंत कमी खर्चात कमी भांडवलात येणारे हे पीक असून त्यासाठी त्यांनी तयार केलेल्या जमिनीवर घरचेच शेणखत दोन ट्रॉली पसरवून दिले. त्यानंतर एक फुटाची सरी पाडून त्यावर बियाण्याची पेरणी केली. पेरणीनंतर पिकाला वेळोवेळी पाणी देणे तर नियंत्रण इत्यादी कामे लक्षपूर्वक पूर्ण केली. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर गाजर पीक काढणीस तयार झाले आहे. त्यातून त्यांना एकरी खर्च वजा जाता एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्यावर्षी याच हंगामामध्ये काढलेल्या गाजरांना सुमारे ९० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना झाले होते.
....
प्रयोगाचे कौतुक
शेतकरी तुकाराम दातीर यांच्या गाजर शेतीच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे. शेतकरी परिस्थितीने कितीही गांजला तरी प्रयोग करायचे सोडत नाही. परिस्थितीवर मात करून खंबीरपणे उभा राहतो याचे हे उत्तम उदाहरण दातीर यांनी घालून दिले आहे.
...