लोणीव्यंकनाथ येथे गुड मॉर्निंग पथकाच्या कॅमे-यात २१ लोटाबहाद्दर कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:16 AM2018-01-05T11:16:43+5:302018-01-05T11:17:13+5:30
श्रीगोंदा : गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी (दि़ ५) भल्या पहाटे लोणीव्यंकनाथ येथे उघड्यावर प्रात:विधी करणा-यांविरोधात कारवाईची मोहिम राबविली़ पथकाचा ...
श्रीगोंदा : गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी (दि़ ५) भल्या पहाटे लोणीव्यंकनाथ येथे उघड्यावर प्रात:विधी करणा-यांविरोधात कारवाईची मोहिम राबविली़ पथकाचा कॅमेरा सुरु होताच उघड्यावर प्रात:विधी करणा-यांची एकच धांदल उडाली़ गुड मॉर्निंग पथकाच्या कॅमे-यात कैद झालेल्या २१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़
श्रीगोंदा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी अण्णासाहेब गहिरे, सागर कुरे, राजू दराडे, गोरक्ष गायकवाड, प्रतिभा डोमे, माधवी खंडागळे, रामभाऊ खामकर, बाळासाहेब डोईफोडे यांच्या पथकाने माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब नाहाटा यांच्या गावावर ‘फोकस’ करीत उघड्यावर प्रात:विधी करणा-यांवर कॅमे-यातून फ्लॅश टाकला आणि एकच धावपळ उडाली. गुड मॉर्निंग पथकाच्या कॅमे-यात २१ जण कैद झाले तर काहीजण पळून गेले, अशी पथकाने ‘लोकमत’ला दिली़ नजीर आतार, शिवाजी खंडागळे, दत्तात्रय मासाळ, इंदू ससाणे, सुरेश धाडगे, व्यंकनाथ मांडे, सुभाष मदने, अनिल आल्हाट, सुरेश कांबळे, लक्ष्मी गोरखे, बापू गोरखे, सुवर्णा ससाणे, श्रीरंग देवकुळे, नितीन जावळे, कैलास शिंदे, सतिश साळवे, राजू जौजाळ, बबन वागस्कर, अनिल जावळे, विजय मिसाळ यांच्या विरोधात कारवाई केली आहे.
बड्या नेत्यांच्या गावांचा अडसर
श्रीगोंदा तालुका हागणदारीमुक्तीच्या उंबरठ्यावर आहे़ २६ जानेवारी २०१८ पर्यंत श्रीगोंदा तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. पण बड्या नेत्यांची गावे असलेली काष्टी, बेलवंडी, हंगेवाडी, आढळगाव, लोणीव्यंकनाथ, भानगाव, कोळगाव, अजनुज ही गावे अडसर ठरली आहेत़ त्यामुळे या गावांकडे गुड मॉर्निंग पथकाने ‘फोकस’ केला आहे. या गावांमध्ये आता रामप्रहरी गुड मॉर्निंग पथकाने सलामी देण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीगोंदा तालुका ८६% हागणदारी मुक्त
श्रीगोंदा तालुका ८६% हागणदारी मुक्त झाला आहे़ दुष्काळी भागातील गावांमध्ये हागणदारीमुक्तीचे चांगले काम झाले आहे़ पण बागायती भागातील गावांनी या अभियानाकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे भविष्यात या गावांना विकास योजना राबविताना हागणदारीचा फटका बसण्याची शक्यता आहे.