आनंदाची बातमी....शुक्रवारपासून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, दुकाने सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:24 PM2020-05-20T20:24:26+5:302020-05-20T20:24:34+5:30
अहमदनगर : चौथ्या लॉकडाऊनमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोनमध्ये झाल्याने जिल्ह्यात अनेक बाबींना २२ मे पासून नव्याने परवानगी देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सर्व बाजारपेठा, दुकाने उघडण्यास, तसेच रिक्षा, टॅक्सी, जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अहमदनगर : चौथ्या लॉकडाऊनमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश ‘नॉन रेड’ झोनमध्ये झाल्याने जिल्ह्यात अनेक बाबींना २२ मे पासून नव्याने परवानगी देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सर्व बाजारपेठा, दुकाने उघडण्यास, तसेच रिक्षा, टॅक्सी, जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलूनही सुरू होणार असून विवाह, दशक्रियाविधीला ५० लोक उपस्थित राहू शकतात, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.राज्य शासनाने रेड झोन व नॉन रेड झोनमधील जिल्हे घोषित केले असून त्यात नगर जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी बुधवारी जिल्ह्यात कोणत्या बाबी सुरू राहतील व कोणत्या बाबींना प्रतिबंध असेल याबाबत आदेश काढले. त्यात प्रामुख्याने कंटेन्मेंट भाग (ज्या भागात कोरोनाचे रूग्ण आढळले) वगळता आतापर्यंत बंद असलेल्या बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. याशिवाय सर्व दुकानेही उघडतील. मात्र याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत असेल. अत्यावश्यक सेवेची दुकाने (मेडिकल, पेट्रोलपंप, एटीएम) मात्र त्यांच्या निर्धारित वेळत सुरू राहतील. दुकानांत गर्दी झाल्याचे आढळल्यास दुकाने त्वरित बंद केली जातील. क्रीडा संकुले, तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या होतील. तथापि प्रेक्षक व सार्वजनिक जमावास बंदी असेल. सर्व खासगी व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी असेल. मात्र दुचाकीवर केवळ एकचजण प्रवास करेल. तीनचाकीवर तीन, तर चार चाकीतही तिघांनाच परवानगी असेल.जिल्हांतर्गत बस सेवेला जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह व शारिरिक अंतर ठेवून व स्वच्छताविषयक उपाययोजनांसह परवानगी असेल.
हे राहणार सुरू
हॉस्पिटल, क्लिनिक, बारूग्ण तपासणी, टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी वाहने (चालकासह तिघे), दुचाकी (केवळ चालक), जिल्हांतर्गत बससेवा, मालवाहतूक, उद्योग, बांधकामे, शहरातील व ग्रामीणमधील सर्व दुकाने, बाजारपेठा, ई-कॉमर्सद्वारे वस्तूपुरवठा, खासगी कार्यालये, शासकीय कार्यालये (१०० टक्के), कृषीविषयक कामे, बँका आणि वित्तीय सेवा, टपाल व कुरिअर सेवा, तातडीच्या वैद्यकीय कारणासाठी प्रवास, कटिंग, सलून, स्पा, ब्यूटीपार्लर, स्टेडियम (प्रेक्षकांशिवाय), रेस्टॉरंट (केवळ होम डिलीवरीकरिता), बसस्थानक, रेल्वेस्थानकवरील कॅन्टीन, दुय्यम निबंधक कार्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, विवाह समारं•ा, अंत्यविधी (केवळ ५० व्यक्तींच्या मर्यादेत).
हे मात्र बंदच
विमान, रेल्वे, मेट्रो वाहतूक, आंतरराज्य रस्ते मार्गाने प्रवास, आंतरजिल्हा बससेवा, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मॉल्स, धार्मिक स्थळे व मोठ्या गर्दीची ठिकाणे, आठवडे बाजार बंद राहणार. ६५ वर्षांवरील व्यक्ती व १० वर्षांखालील मुले व गरोदर स्त्रिया यांना घराबाहेर पडता येणार नाही. १४४ कलम कायम जिल्ह्यात अनेक व्यवहारांना परवानगी दिलेली असली तरी कलम १४४ अन्वये सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील.
सातच्या आत घरातअत्यावश्यक
सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर, फिरण्यास सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत निर्बंध राहतील. सर्व सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानांत ग्राहकांमध्ये ६ फुटांचे अंतर राखावे व पाच पेक्षा जास्त ग्राहक एका ठिकाणी नसावेत, असे आदेशात म्हटले आहे.