शेतक-यांसाठी गोड बातमी..यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के जादा पाऊस; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:58 PM2020-05-25T17:58:01+5:302020-05-25T17:58:47+5:30
यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोगी शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली.
भाऊसाहेब येवले / राहुरी : यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहयोगी शास्त्रज्ञ रवींद्र आंधळे यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली.
भारतात पावसाची सरासरी अकराशे ते बाराशे मिलिमीटर आहे. महाराष्ट्रात पावसाची सरासरी ७०० ते ८०० मिलिमीटर आहे. अहमदनगर जिल्ह्यात पाचशे ते साडेपाचशे मिलिमीटर पावसाची सरासरी आहे. सध्या मान्सून अंदमान निकोबार येथे अडकून पडला आहे. तो पुढे सरकल्यानंतर १ जूनला केरळला येत असतो. यंदा मात्र ५ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत, असे रवींद्र आंधळे यांनी सांगितले.
राहुरी येथे सोमवारी ४१ अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच काळात ४२ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भामध्ये उष्णतेची लाट आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान सध्या ४५ अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तापमानात होणारी वाढ लक्षात घेता पिकांना पाण्याची गरजही वाढू लागली आहे. पिकांना संध्याकाळी पाणी द्यावे, असे त्यांनी सूचविले आहे.
सध्या उष्णतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मी महिन्यात कपाशीची लागवड करू नये. २५ मे नंतर बीटी कॉटनची लागवड करण्याची शिफारस आहे. मात्र सध्याचे तापमान लक्षात घेता पावसाचा शिरकाव झाल्यानंतर कपाशीची लागवड करावी. जूनअखेर कपाशीची लागवड पूर्ण करावी. यंदा सरासरीपेक्षा चार ते पाच टक्के पाऊस अधिक पडण्याची शक्यता आहे.
-रवींद्र आंधळे, सहयोगी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.