नगरच्या ‘स्रेहालय’ची सद्भावना यात्रा सेवाग्राम आश्रमात पोहोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 04:25 PM2019-10-02T16:25:30+5:302019-10-02T16:26:00+5:30
नगर येथील स्नेहालय परिवाराने यांनी विनोबा भावे व महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने गागोदे (रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) सद्भावना सायकल यात्रा काढली होती. ही यात्रा ८५० किलोमीटरचे अंतर पार करून बुधवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली.
अहमदनगर : येथील स्नेहालय परिवाराने यांनी विनोबा भावे व महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने गागोदे (रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) सद्भावना सायकल यात्रा काढली होती. ही यात्रा ८५० किलोमीटरचे अंतर पार करून बुधवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली. यात्रेकरुंनी महात्मा गांधींच्या संदेशाचा जयघोष करीत महात्मा गांधींचा आश्रम दुमदुमून सोडला.
स्नेहालय परिवाराचे गिरीश कुलकर्णी, अॅड. शाम आसावा यांच्या मार्गदर्शनाखाली ११ सप्टेंबर रोजी आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेल्या गागोदे येथून सद्भावना सायकल यात्रेस सुरुवात झाली होती. ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयात जाऊन पथनाट्याद्वारे राष्ट्रीय ऐक्य, बंधूभाव यांचा संदेश यात्रेतून दिला.
खोपोली येथील गगनगिरी महाराज आश्रम, लोणावळा येथील मन:शांती केंद्र, पुणे येथील विद्यार्थी सहाय्यता समिती, वाघोली येथील भूकंप पुनर्वसन शाळेस या सायकल यात्रेने भेट दिली. राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरेबाजार येथे पोपटराव पवार, पाटोदा येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या कामाची प्रेरणा घेतली.
२३ दिवसाच्या सायकल प्रवासानंतर यात्रेकरु वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या विचार परिषद सेंटरमध्ये दाखल झाले. बुधवारी (दि.२) सकाळी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली.
यात्रेत जागतिक सायकलिष्ट हिरालाल यादव, अपंग आॅलपिक खेळाडू रमेशभाई ठाकूर, वृक्षक्रांतीचे जनक ए.एस.नाथन, बिलाल अहमद, वांबोरी येथील ९ वर्षाचा इशान वेताळ, दिव्यांग दत्तू थोरात, पूजा पोपळभट, सोनाली दहिफळे या दोन मुली सहभागी झाल्या होत्या.