खर्डा गावात गोपाळघरे परिवाराने फळझाडे लावून केले अस्थिविसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:10 PM2018-04-26T19:10:55+5:302018-04-26T19:16:55+5:30
इनामवस्ती खर्डा येथील यशवंता फकीर गोपाळघरे यांचे १०५ व्या वर्षी निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अस्थिचे विसर्जन करून जलप्रदूषण न करता घराच्या परिसरात फळझाडे लावून खत म्हणून तेथेच निसर्गाच्या कुशीत अस्थी विसर्जन केले. अंधश्रद्धा बाजूला ठेऊन समाजाला आदर्श संदेश दिल्याने या कृतीचे कौतुक होत आहे.
खर्डा : इनामवस्ती खर्डा येथील यशवंता फकीर गोपाळघरे यांचे १०५ व्या वर्षी निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अस्थिचे विसर्जन करून जलप्रदूषण न करता घराच्या परिसरात फळझाडे लावून खत म्हणून तेथेच निसर्गाच्या कुशीत अस्थी विसर्जन केले. अंधश्रद्धा बाजूला ठेऊन समाजाला आदर्श संदेश दिल्याने या कृतीचे कौतुक होत आहे.
यशवंता गोपाळघरे यांच्या मागे ३ मुले, ५ मुली, २२ नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत गोपाळघरे हे निसर्गावर प्रेम करणारे होते. त्यांचे नातू दत्ता याच्याशी बोलताना मृत्यूनंतर माझी राख नदीच्या पात्रात न टाकता शेतात फळझाडे लावून त्या फळझाडांना खताच्या स्वरुपात झाडांना घाला. या झाडांच्या फळा, फुलांचा माझी मुले, नातवंडांसह समाजातील लोक आस्वाद घेत माझी आठवण चिरंत ठेवतील, अशी इच्छा व्यक्त केली होती. हा त्यांचा आदर्श विचार नातू दत्ता गोपाळघरे यांनी सरपंच संजय गोपाळघरे, मुले, मुली, नातवंडे, जावई, नातवंडांसमोर मांडला. त्यास थोरला मुलगा भीमरावसह श्रीराम व अश्रुबा या मुलांनी संमती दिली.
अस्थिविसर्जनासह धार्मिक विधीला फाटा देऊन तीर्थक्षेत्री न जाता आंबा, रामफळ, पेरू, चिकुसह फळझाडे रोपे आणून शेतात खड्डे खोदून त्यात फळझाडे लावत निसर्गाच्या कुशीत अस्थिविसर्जन करीत जलप्रदूषण टाळून नवा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला. पाणीप्रदूषण टाळून जमिनीत अस्थी वृक्षाला टाकून जमिनीचा पोत वाढविण्यासाठी मदत होते. गोपाळघरे कुटुंबाचा आदर्श घेऊन समाजात नागरिकांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जलप्रदूषण टाळून वृक्षारोपण करण्याचा सामाजिक संदेश इतरांनी कृतीत आणण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.