गोसावी समाजाची पालं कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:10+5:302021-05-09T04:21:10+5:30

चंद्रकांत शेळके अहमदनगर : सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असताना, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच कोरोनाने पछाडलेले असताना नगर तालुक्यातील टाकळी काझी ...

The Gosavi community is free from coronation | गोसावी समाजाची पालं कोरोनामुक्त

गोसावी समाजाची पालं कोरोनामुक्त

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असताना, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच कोरोनाने पछाडलेले असताना नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील गोसावी समाजाने मात्र कोरोनाला आपल्या झोपडीत घुसू दिलेले नाही. मात्र, या लाॅकडाऊनमुळे त्यांची रोजीरोटी थांबली असल्याने लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.

नगरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर नगर तालुक्यातील टाकळी काझी शिवारात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेली नाथपंथी डवरी-गोसावी समाजातील सुमारे ५० पालं गेल्या वर्षभरापासून स्थायिक आहेत. रोज लोकांच्या दारोदारी जाऊन आपल्या बहुरूपी कलेद्वारे त्यांचे मनोरंजन करत मिळालेल्या पैशातून गुजराण करणारी ही माणसं आज लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेली आहेत. ‌‘लोकमत’ने या पालावर जाऊन त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेतल्या. तेव्हा त्यांनी मनमोकळेपणाने आपली व्यथा मांडली.

विशेष म्हणजे उपाशी असले तरी मोठ्या शिस्तीने आणि नियमांचे पालन करून या लोकांनी कोरोनाला आपल्या पालात शिरकाव करू दिलेला नाही; परंतु शासनाने यांच्यासाठी काहीतरी मदतीचा हात द्यावा किंवा रोजीरोटीची सोय करावी. एवढीच त्यांची मागणी आहे. घोडेगाव, जामखेड, नेवासा, श्रीगोंदा आदी भागांतून ही कुटुंबे गेेल्या वर्षी टाकळी काझी शिवारात आलेली आहेत. घरातील पुरुषाने बहुरूप्याचे सोंग घेऊन दररोज एका गावाला जायचे. आपल्या कलेतून दारोदार लोकांचे मनोरंजन करून मिळेल, ते गोळा करायचे, हा त्यांचा नित्यक्रम; परंतु वर्षभरापासून कोरोनाचे संकट असल्याने लोकांनी त्यांच्यासाठी आपली दारे बंद केली आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या भीतीने या लोकांनीही आपली पालं सोडली नाहीत. त्यामुळे कोरोना त्यांच्या पालापर्यंत अद्याप तरी आलेला नाही. फक्त कामधंदा नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. शासनाने किंवा दानशूरांनी त्यांना मदत करावी, एवढीच त्यांची सध्याची माफक अपेक्षा आहे.

-----------

अर्धी, कोर खाऊन सध्या दिवस काढत आहोत. मात्र, दारोदार फिरणे बंद केल्याने आमच्यापर्यंत अजून कोरोना आलेला नाही. आमचे सर्व लोक कोरोनाच्या भीतीपोटी झोपडीच्या बाहेरही निघत नाहीत.

-बाळू चेगर

---------

आपापली गावं सोडून आम्ही गेल्या वर्षापासून येथे अडकून पडलो आहोत. कोरोनामुळे कोणी दारात येऊ देईना. त्यामुळे सध्या कुटुंबाची गुजराण करणे अवघड झाले आहे. उगवला दिवस घालायचा कसा, एवढीच चिंता आमच्यासमोर आहे.

-एम.डी. सावंत

--------

कोरोनानं आमची लय पंचाईत केलिया. कामधंदा बंद असल्यानं समदी माणसं घरीच हायती. पोराबाळांचा रडून घसा मोकळा झालाय. एवढा वाईट काळ जाउस्तोवर शासनानं आम्हाला पोटापुरतं द्यावं, एवढीच आपेक्षा हाय.

-अंजना चव्हाण

-------

कोरोना रोगामुळं या गावात अडकून पडलोया. आमच्या गावाला गेलो असतो, तर काहीतरी केलं असतं. पर आता जाताबी येईना. काम नाय, तर चुलबी पेटत नाय. आमच्यासारख्या गरिबानं जगायचं कसं?

-रंजना शिंदे

------------

कोरोनामुळे ही गोसावी वस्ती संकटात सापडली आहे; परंतु आम्ही दानशूरांच्या मदतीने यांच्यासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत काही धान्य, कपडे, अशी मदत केली आहे. यांच्यासारखी अनेक उपेक्षित, गरजू लोक या लाॅकडाऊनमध्ये अडकले आहेत. समाजाने यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.

-युवराज गुंड, अध्यक्ष, हेल्पिंग हँड सामाजिक संघटना

---------

फोटो - ०७बाळू चेगर,

०७एम. डी. सावंत

०७अंजना चव्हाण, ०७रंजना शिंदे, ०७युवराज गुंड.

०७ टाकळी तांडा

Web Title: The Gosavi community is free from coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.