शासनाकडून साईनगरीत लसीकरणाला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:27+5:302021-05-08T04:21:27+5:30
सध्या केवळ शासकीय केंद्रावर लस उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुर्दैवाने शिर्डीत लसीकरण करू शकणारे शासकीय केंद्रच नसल्याने ...
सध्या केवळ शासकीय केंद्रावर लस उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुर्दैवाने शिर्डीत लसीकरण करू शकणारे शासकीय केंद्रच नसल्याने संस्थानच्या खासगी केंद्राला लस मिळणार नाही. यामुळे शिर्डीतील नागरिकांना जवळपासच्या गावामध्ये जाऊन लस घ्यावी लागेल. संस्थानने शिर्डीतील केंद्राला सशुल्क लस मिळण्यासाठी पैसे भरूनही लस उपलब्ध झालेली नाही. पुनावाला यांनी खासगी रुग्णालयांना किमान सप्टेंबरपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याचे सुतोवाच केल्याने शिर्डीकरांचे धाबे दणाणले आहे.
एरवी राज्य सरकार व प्रशासन साईबाबा संस्थानला शासकीय समजून विविध कामांचे आदेश देते. सध्या संस्थानकडून मोफत सुरू असलेली कोविड रुग्णसेवा हजारो गोरगरीब रुग्णांना मोठा आधार ठरत आहे. संस्थानला आदेश व सूचना सोडून काही देण्याचा विषय येतो तेव्हा सरकार व जिल्हा प्रशासन हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे. संस्थानच्या रुग्णालयाला रेमडेसिविरच्या उपलब्धतेबाबत आलेला अनुभव ताजा आहे. शिर्डीत मोफत शक्य नसली तरी किमान पुरेशी सशुल्क लसींची उपलब्धता करून देणे, शक्य असेल तर संस्थानातील लसीकरण केंद्राचा समावेश शासकीय यादीत करणे, यासाठी प्रयत्न व्हायला हवे.
दुर्दैवाने साईबाबा संस्थानने शिर्डी नगर पंचायतप्रमाणे आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करून घेतले नाही. कोविड रुग्णसेवेत असलेले स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा कर्मचारीही लसीपासून वंचित राहिले. संस्थानच्या या अक्षम्य चुकीमुळे आजवर कोरोनाने कित्येक कर्मचाऱ्यांचे बळी घेतले आहे. संस्थान अद्यापही याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही.