ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द, तिजोरी खुली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 05:39 PM2019-07-31T17:39:59+5:302019-07-31T17:51:29+5:30
ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिर्डी : ग्रामविकासाकरिता शासन कटिबध्द असून तिजोरी खुली आहे. सरपंचानी ठरविले तर ग्रामविकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिर्डी येथील सरपंच परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासाचे मंथन एकत्रितरित्या होत आहे. ४१ वी सरपंच परिषद शिर्डीला होत आहे हे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात गावात मूलभूत गरजा देता आल्या नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकासाचे नवे मॉडेल समोर ठेवले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे 30 हजार किमीचे रस्ते पूर्ण करणार आहे. महाराष्ट्रातल्या सरपंचांनी दोन अडीच हजार गावे आदर्श केली. म्हणून त्यांना संरक्षण देण्यासाठी थेट जनतेतून निवडीचा निर्णय घेतला. सुशिक्षित सरपंच नव्या कल्पना घेऊन पुढे येऊ लागले. महिला पुढे येत आहेत. गावातील मुलांना पुढे नेण्याचे काम महिला सरपंच करीत आहेत. सरपंचाचे तीन पटींनी मानधन वाढविले. हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. सदस्यांचा लवकरच मिटिंग भत्ता वाढविण्याचा निर्णय घेणार आहे. ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार कार्यवाही करू. शेतीच्या माध्यमातून प्रगती, ठिबकसाठी 80 टक्के अनुदानाच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देत आहोत. 5 हजार मेगावॅट वीज सोलर फिडरद्वारे देऊन दिवसा शेतक-यांना 12 तास वीज देणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.