आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकारचा दरोडा :बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 04:49 PM2018-07-06T16:49:37+5:302018-07-06T16:49:53+5:30

नोटबंदी असो की जीएसटी, देशातल्या सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाशी क्रूर खेळ करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ती जायची चिन्ह दिसत नाहीत. भारतातील तमाम जनतेने पिढ्यान्पिढ्या विश्वासाने पैसे गुंतविलेल्या आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकार आता डाका घालायला निघाले आहे.

Government crackdown on life insurance bill: Balasaheb Thorat | आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकारचा दरोडा :बाळासाहेब थोरात

आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकारचा दरोडा :बाळासाहेब थोरात

संगमनेर(अहमदनगर) : नोटबंदी असो की जीएसटी, देशातल्या सामान्य माणसाच्या घामाच्या पैशाशी क्रूर खेळ करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या तरी ती जायची चिन्ह दिसत नाहीत. भारतातील तमाम जनतेने पिढ्यान्पिढ्या विश्वासाने पैसे गुंतविलेल्या आयुर्विमा मंडळाच्या तिजोरीवर सरकार आता डाका घालायला निघाले आहे.
दिवसेंदिवस गर्तेत चाललेल्या आयडीबीआय बँकेला वाचविण्यासाठी आयुर्विमा महामंडळाला या बॅँकेत १३ हजार कोटी रूपये गुंतवणूक करण्याचा व ५१ टक्के मालकी देण्याचा प्रस्ताव आहे. ही एक बेकायदेशीर आणि धोकादायक गोष्ट आहे, अशी टीका माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या फेसबूक पेजवरून भाजप सरकारवर केली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीच्या २०१३ सुधारित नियमानुसार आयुर्विमा महामंडळाला कुठेही १५ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. गेल्या शुक्रवारी सर्व नियम मोडून या सरकारी प्रस्तावाला मान्यता दिली. मोदी सरकारचा प्रस्ताव नाकारण्याची आजकाल कुणाची हिंमत नाही. आयुर्विमा महामंडळाकडे लोकांनी भरलेल्या प्रिमीयमपोटी दरवर्षी दोन लाख कोटी रुपये जमा होतात. त्यामुळे ही गुंतवणूक नगण्य आहे असा प्रचार सध्या सरकारचे भाट करीत आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते मात्र हा आचरटपणा आयुर्विमा महामंडळाला पार बुडीत नेऊ शकतो. एखादी विमा कंपनी आर्थिकदृट्या सक्षम आहे की नाही हे तिच्याकडे असलेल्या संपत्तीवरून ठरत नाही, असे थोरात म्हणाले.

सरकारचा हास्यास्पद प्रचार
आयुर्विमा महामंडळाला त्यामुळे बँकिंग क्षेत्रात उतरण्याची संधी मिळेल. आयडीबीआयच्या शाखांचं देशभर जाळं आहे त्याचा वापर करता येईल, असा हास्यास्पद प्रचार सरकारतर्फे चालू आहे. ज्यात आपल्याला काडीचाही अनुभव नाही त्यात आयुर्विमा महामंडळाने का उतरावं? त्यांच्या एजंटांचं जाळं देशाच्या कानाकोपरी पसरलं आहे. शिवाय आजकाल इंटरनेटच्या प्रसारामुळे अनेक लोक विमा पॉलिसी आॅनलाईन खरेदी करतात. दुचाकीवरुन करता येईल अशा कामासाठी ट्रॅक्टर घ्यायचा काय? देश चालवायला सरकारकडे आर्थिक साक्षरता हवी. जी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे विपुल प्रमाणात होती. आता सगळा आनंदच आहे,अशी टीका माजी मंत्री थोरात यांनी भाजप सरकारवर केली आहे.

Web Title: Government crackdown on life insurance bill: Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.