सरकार साहित्यिकांचा गळा दाबत नाही - डॉ. गिरीष प्रभुणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:04 PM2017-12-09T12:04:24+5:302017-12-09T12:05:33+5:30
साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे.
अहमदनगर : साहित्यिकांनी राष्ट्रभान अन् समाजभान जपत लेखन केले पाहिजे. विघातक लेखन कुणीही करु नये. सद्यस्थितीत लेखक अन् प्रकाशकांवर सरकाचे कसल्याही प्रकारचे बंधन नाही. लेखकाला स्वातंत्र्य असल्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती होत आहे. त्यामुळे साहित्यिकांचा कोणीही गळा दाबत नाही, असे १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.
संमेलनासाठी नगरमध्ये आल्यानंतर डॉ़ प्रभुणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले, साहित्य क्षेत्रात सरकाराची भुमिका मर्यादित असावी. मार्गदर्शक आणि अर्थसहाय्य सरकारने केले पाहिजे. ही जबाबदारी सरकार सक्षमपणे पार पडत आहे. पुस्तके छापण्यावर सरकारचे बंधन नाही. पुर्वीपेक्षा आजची परिस्थिती बदलली आहे. आज कोणीही लिहू शकतो. काय लिहावे यावरही बंधन नाही. मात्र साहित्यिकांनी आपल्या मातीशी असलेली नाळ तोडू नये. विघातक प्रकारचे लेखन करु नये. आपल्या मातीचे ऋण साहित्यातून व्यक्त केले पाहिजे. राष्ट्रीयता जपली पाहिजे. जगभरात रक्तरंजिक क्रांती झाल्या़ मात्र भारतात आपोआप बदल होत गेला. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपला देश प्रगल्भ आहे. भारतीय संस्कृतीत सामाजिक समरसतेचे मूल्य आहे. त्यामुळे भारतीय साहित्याचा विकास झाला आहे. दुर्लक्षित घटकांतील साहित्यिक उदयास आले आहेत. समरसता मुल्यांचा विकास साहित्य क्षेत्र बंधनमुक्त असल्याने झाला आहे. गुलामगिरीत कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही. त्यामुळे सरकार साहित्यिकांचा गळा दाबत आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे.