शासनाने शेडनेट, पॉलिहाऊस धारक शेतक-यांनाही दिलासा द्यावा; राधाकृष्ण विखे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 02:23 PM2020-06-07T14:23:45+5:302020-06-07T14:25:06+5:30
शासनाने शेडनेट आणि पॉलिहाऊस धारक शेतक-यांनाही दिलासा देण्याचा गांभीर्याने विचार करावा. येत्या पावसाळी आधिवेशनात कृषिमंत्र्यांसोबत चर्चा करून या शेतक-यांना मदत करण्याबाबत आग्रह धरणार आहे, असे माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
संगमनेर : नैसर्गिक आपत्ती नियमांमध्ये पॉलिहाऊस आणि शेडनेटच्या नुकसानीच्या मदतीबाबतचा कोणताही उल्लेख नाही. पिकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय करताना शासनाने शेडनेट आणि पॉलिहाऊस धारक शेतक-यांनाही दिलासा देण्याचा गांभीर्याने विचार करावा. येत्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्र्यांसोबत चर्चा करून या शेतक-यांना मदत करण्याबाबत आग्रह धरणार आहे, असे माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथे मोठ्या संख्येने पॉलिहाऊस आणि शेडनेटच्या माध्यमातून तरूण शेतकरी शेती उत्पादन घेतात. निसर्ग चक्रीवादळाने पिकांबरोबर पॉलिहाऊस आणि शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रविवारी(दि.७ जून) आमदार विखे यांनी या शेतक-यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी विखे माध्यमांशी बोलत होते.
उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहिणी निघुते, माजी उपसभापती मच्छिंद्र थेटे, सरपंच अमोल जोंधळे, बाळासाहेब डेंगळे, किरण आरगडे, पर्यवेक्षक प्रशांत वाकचौरे आदी यावेळी उपस्थित होते.
महसूल आणि कृषि विभागाने वडगाव मावळचा पॅटर्न राबवून पंचनाम्याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी सुचनाही आमदार विखे यांनी अधिका-यांना केली.