शासनाने दुग्ध व्यवसायातील खासगीकरणावर निर्बंध घालावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:22 AM2021-03-09T04:22:21+5:302021-03-09T04:22:21+5:30

कोपरगाव : दुग्ध व्यवसायामध्ये सहकार आणि खासगी भांडवलदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढल्याने सहकारी संस्था अडचणीत सापडल्या आहेत. सहकार ...

The government should impose restrictions on privatization of dairy business | शासनाने दुग्ध व्यवसायातील खासगीकरणावर निर्बंध घालावेत

शासनाने दुग्ध व्यवसायातील खासगीकरणावर निर्बंध घालावेत

कोपरगाव : दुग्ध व्यवसायामध्ये सहकार आणि खासगी भांडवलदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढल्याने सहकारी संस्था अडचणीत सापडल्या आहेत. सहकार टिकविण्यासाठी शासनाने खासगीकरणावर काही निर्बंध घालावेत, असा ठराव गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूधसंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी संघाच्या वार्षिक सभेत मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

गोदावरी दूध संघाची ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत नुकतीच पार पडली. प्रारंभी संघाचे संस्थापक स्व. नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.

परजणे म्हणाले, भारतात सर्वप्रथम गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात सॉर्टेडसिमेन ही कृत्रिमरेतन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्याद्वारे ९३ टक्के कालवडींची पैदास झालेली असून, या कालवडी आजरोजी दूध उत्पादनासदेखील तयार झालेल्या आहेत. या कालवडींपासून प्रत्येकी सुमारे २८ लिटर दूध मिळते. हा या उपक्रमातला उच्चांक आहे. याशिवाय राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडून संघाच्या कार्यक्षेत्रातील उत्पादकांसाठी अनुदानावर बायोगॅस युनिट देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संघात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या परिवारास सुमारे २० लाख रुपयाचा संरक्षण विमा देण्याची सुविधादेखील संघाने केलेली असल्याचेही परजणे यांनी सांगितले.

या सभेस माजी संचालक नानासाहेब सिनगर, ज्ञानदेव गुडघे, भागवतराव धनवटे, अंबादास वराडे, संघाचे उपाध्यक्ष संजय खांडेकर, संचालक उत्तमराव माने, विवेक परजणे, सुभाषराव होन, निवृत्ती नवले, सुनील खालकर, भाऊसाहेब कदम, यशवंतराव गव्हाणे, सदाशिव कार्ले, भिकाजी थोरात, गोपीनाथ केदार, दिलीप तिरमखे, कुंदाताई डांगे यांच्यासह दूध उत्पादक सभासद उपस्थित होते. माजी संचालक ज्ञानदेव गुडघे यांनी आभार मानले.

Web Title: The government should impose restrictions on privatization of dairy business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.