सरकारने महर्षी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार सुरु करावा; तनपुरे महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:44 PM2018-01-31T16:44:41+5:302018-01-31T16:47:21+5:30
अहमदनगर येथील न्यू आर्टस् कॉलेजमध्ये महर्षी शिंदे अभ्यास केंद्र
अहमदनगर : निष्कलंक चारित्र्य, समाजाभिमुकता हे समाजसुधारकाचे दोन दागिने आहेत. ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कमावले. जातपात, दास्यत्त्वामुक्तीसाठी समतेचा नारा देत बहुजनांची वाणी झालेले महर्षी शिंदे इतिहासात उपेक्षित राहिले. महर्षी शिंदे यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे सरकारने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार सुरु करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलापर्यंत आम्ही हा प्रस्ताव पोहोचविला आहे. आता त्यांनी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सांगितले.
येथील न्यू आर्टस् महाविद्यालयात डॉ. भी. ना. दहातोंडे यांच्या कल्पनेतून ग्रंथालय विभागात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (धर्म, समाज, संस्कृती व तत्वज्ञान) अभ्यासकेंद्र सुरु करण्यात आले आहे. या अभ्यास केंद्रास दहातोंडे यांनी १२० वर्षांपासूनची जुनी १०५ पुस्तके भेट दिली. या अभ्यास केंद्राचे उद्घाटन बुधवारी (दि. ३१) तनपुरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तनपुरे महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे होते. व्यासपीठावर आदिनाथ महाराज आंधळे, माजी प्राचार्य डॉ. भी़ ना. दहातोंडे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य आर. जी. कोल्हे उपस्थित होते.
तनपुरे महाराज म्हणाले, दहातोंडे हे झपाटलेला माणूस आहे. त्यांनी महर्षी शिंदे यांच्यावरील संशोधनासाठी वाहून घेतले आहे. नगर ही साधुसंतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. या भूमीतूनच दहातोंडे यांनी महर्षी शिंदे यांचे थोर समाजकार्य पुढे आणण्यासाठी वाहून घेतले आहे.
सूत्रसंचालन एम. डी. कोकटे यांनी केले.
महर्षी शिंदेंनी शोधला बहुजन शब्द
महर्षी शिंदे यांनी सर्वप्रथम बहुजन हा शब्दप्रयोग केला. त्यानंतर डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना शब्दप्रयोग खूप आवडला आणि त्यांनी तो त्यांच्या विविध संशोधन लेखांमध्ये वापरला. महर्षी शिंदे यांनी जाती-पातीत ऐक्य निर्माण करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांच्यावर त्याकाळी कठोर टीकाही झाली. पण ते सहनसिद्ध होते. महर्षी शिंदे यांनी जातीय सलोख्यासाठी जीवन वेचले. पण त्यांनी कोणत्याही एका जातीचा उदोउदो केला नाही. म्हणूनच ते इतिहास दुर्लक्षित राहिले, असे डॉ. भी. ना. दहातोंडे यांनी सांगितले.