प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ पुन्हा उभा करण्यासाठी सरकार मदत करील- राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:28 PM2018-04-03T17:28:57+5:302018-04-03T17:29:32+5:30
आगीसारख्या दुर्दैवी घटनेमुळे हा स्टुडिओ भस्मसात झाला असला तरी राज्य शासन निश्चितपणे त्यांच्या पाठिशी असून यासंदर्भात व्यापक दृष्टीकोन ठेवून आणि हा स्टुडिओ पुन्हा उभा राहावा, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील
अहमदनगर : शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ हा नगर शहर आणि जिल्ह्यासाठी वेगळा असा ठेवा होता. नगरकरांचा तो अभिमान होता. आगीसारख्या दुर्दैवी घटनेमुळे हा स्टुडिओ भस्मसात झाला असला तरी राज्य शासन निश्चितपणे त्यांच्या पाठिशी असून यासंदर्भात व्यापक दृष्टीकोन ठेवून आणि हा स्टुडिओ पुन्हा उभा राहावा, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जलसंधारण व राजशिष्टाचार, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी मंगळवारी दुपारी प्रमोद कांबळे आर्ट स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली. आगीत झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शिंदे म्हणाले, प्रचंड मेहनतीतून कांबळे यांनी तयार केलेली शिल्पे, मूर्ती, विविध चित्रे, विविध मान्यवरांच्या चित्रांचा संग्रह या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. स्टुडिओत असणारा अमूल्य ठेवा नष्ट झाल्याबद्दल खेद व्यक्त करीत तुम्ही पुन्हा उभारी घ्याल, असा आशावादही शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रमोद कांबळे यांनी स्टुडिओसंदर्भातील विविध बाबींची माहिती पालकमंत्री प्रा. शिंदे यांना दिली.
तत्पूर्वी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी कांबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. आगीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. नगर शहर व जिल्हावासीय या कठीण प्रसंगी आपल्यासोबत असल्याचा आणि राज्य शासन व्यापक दृष्टीकोन ठेवून याकामी तुमच्या पाठिशी असेल, असा विश्वास पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी दिला.