सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय - राधाकृष्ण विखे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2023 07:31 PM2023-05-01T19:31:27+5:302023-05-01T19:31:44+5:30

‘सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌

Government's revolutionary decision to give sand brass for Rs 600 to common people says Radhakrishna Vikhe-Patil | सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय - राधाकृष्ण विखे-पाटील

सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय - राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डी (अहमदनगर) : ‘सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री‌ तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. यावेळी विखे-पाटील‌ बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, नायगांवचे सरपंच राजाराम राशीनकर, दीपक पठारे आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले की,  बेकायदेशीर वाळू उत्खनातून महाराष्ट्रात वाळू माफियांचे साम्राज्य  निर्माण झाले होते. अवैध वाळू विक्री वाढली होती‌. पर्यावरणाची हानी होत होती. यातून शासनाचा ही कोट्यवधीचा महसूल बुडत होता‌. यामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करुन देण्याकरीता वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला.

कोवीड संकटानंतर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकरी, कष्टकरी मेटाकुटीला आला होता‌. सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले.  शासनाने अतिवृष्टीच्या पावसाच्या निकषात बदल केला. एक रूपयात शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात येत आहे. जून अखेर अहमदनगर जिल्ह्यातील जमिनीची शंभर टक्के मोजणी करून घरपोच नकाशे दिले जाणार आहेत‌‌. यासाठी जिल्ह्यासाठी प्रत्येकी वीस लाख रूपये किंमतीचे २४ रोव्हर खरेदी करण्यात आले आहेत.’’ असेही महसूलमंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.     

महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले की,  १ जूलै‌ पासून जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांना १५ दिवसांत जमीन मोजणी करून नकाशे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एकाच अर्जाद्वारे नऊ‌ प्रकारचे दाखले दिले जाणार आहेत‌‌. जिल्ह्यातील कृषी आराखड्यानुसार शेती पद्धतीत गांभीर्यपूर्वक मुलभूत बदल करण्याची गरज असल्याचे’’ मतही  विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. अहमदनगर जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने निर्भयपणे काम करावे. असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री विखे पाटील यांच्याहस्ते यावेळी ६०० रूपये वाळू ब्रासच्या राज्यातील पहिल्या लाभार्थी मंगल व्यवहारे (रा. मातुलठाण) व नंदा गायकवाड (रा. नायगांव) यांना लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी राधाकिसन दडे व बाळासाहेब वाघचौरे यांनाही वाळू लाभ प्रमाणपत्र देण्यात आले.

असा असणार आहे वाळू डेपो  -
नायगाव वाळू डेपोसाठी गोदावरी नदीपात्रातून मातुलठाण येथील ३ तर नायगाव येथील २ वाळुसाठे उपलब्ध करण्यात आले आहेत. या उत्खन्नाचा व वाळू डेपोचा ठेका श्रीरामपूर येथील ‘देवा इंटरप्राईजेस’ या संस्थेला देण्यात आला आहे. ग्राहकांना 'महाखनिज' या ऑनलाईन अॅपवर मागणी नोंदवल्यानंतर ६०० रुपये ब्रास व वाहनाच्या प्रकारानुसार प्रति किलोमीटर दर ठरवून घरपोच वाळू दिली जाणार आहे. एका कुटुंबाला एका महिन्यात जास्तीत जास्त १० ब्रास वाळू उपलब्ध केली जाणार आहे. नायगावचा डेपो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून विविध ठिकाणी डेपो सुरू केला जाणार आहेत. या डेपोतून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम असल्याने भष्ट्राचार,अनियमितेला शून्य वाव आहे. या वाळू डेपोंचे काम www.mahakhanij.maharashtra.gov.in या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून चालणार आहे. या संकेतस्थळावर जिल्हानिहाय वाळू साठे व शिल्लक ब्रास यांची आकडेवारी दैंनदिन प्रसिध्द होईल. नागरिक घरबसल्या आवश्यक वाळू ब्रास मागणी ऑनलाईन नोंदवू शकणार आहेत.

Web Title: Government's revolutionary decision to give sand brass for Rs 600 to common people says Radhakrishna Vikhe-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.