शासकीय वाळू विक्रीचा कोटा संपला, नोंदणी बंद; श्रीरामपुरातील स्थिती
By शिवाजी पवार | Published: December 15, 2023 03:10 PM2023-12-15T15:10:20+5:302023-12-15T15:10:33+5:30
अनेक लाभार्थी फिरले माघारी, बांधकामे थांबली
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील दोन शासकीय वाळू विक्री केंद्रावरील कोटा पूर्ण झाल्यामुळे ६०० रुपये ब्रासची विक्री थांबविण्यात आली आहे, अशी माहिती नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी दिली. वाढीव वाळू उत्खननास परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील वांगी व एकलहरे येथे दोन केंद्रावरून वाळूची विक्री सुरू आहे. त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये घरांच्या बांधकामासाठी नागरिकांना ६०० रुपये ब्रास प्रमाणे नोंदणी करून चलन देण्यात येत होते. मात्र पाच दिवसांपासून गर्दी उसळल्याचे चित्र होते. तहसीलमध्ये त्यामुळे गोंधळ दिसून येत होता. यावर ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते.
नायब तहसीलदार वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वांगी येथील १४०० ब्रास व एकलहरे येथील १८०० ब्रास अशा ३२०० ब्रास वाळू विक्रीचा कोटा संपला आहे. त्यामुळे नव्याने वाळू विक्रीची नोंदणी थांबविण्यात आली आहे. दोन्ही वाळू केंद्रांवरून अधिकच्या एक हजार ब्रास विक्रीचा निर्णय झाल्यास शिल्लक लाभार्थ्यांची पुन्हा नोंदणी सुरू करू.
मागील अनुभवावरून सुधारणा करण्याच्या हेतूने तहसीलमध्ये वाळू विक्रीची नोंदणी सुरू केली. यापूर्वी सेतू कार्यालयांमध्ये नोंदणी केली जात होती. मात्र खऱ्या लाभार्थ्यांना वाळू विक्री करण्याच्या हेतूने व त्यातील गडबडी रोखण्यासाठी तहसीलमध्ये प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचे चांगले फायदे दिसून आले. महाखनिजचे लॉगिनचे अधिकार तहसील कार्यालयास ठेवण्यात आले. त्यामुळे गर्दी होणे स्वाभाविक होते. मात्र यातून डमी ग्राहक उभे करून वाळूचा लाभ देण्याच्या प्रकाराला चाप बसला, असे वाकचौरे यांनी सांगितले.