टँकर गेले कुण्या गावा ? जीपीएस गुल अन् लॉगबुकही बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 04:35 PM2019-05-11T16:35:07+5:302019-05-11T16:36:49+5:30
तालुक्यातील कुसडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भोगलवाडी व सरदवाडी येथे टँकर येतो. परंतु टँकरसाठी असलेले शासकीय नियम पायदळी तुडवले जात आहे.
अशोक निमोणकर
जामखेड : तालुक्यातील कुसडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भोगलवाडी व सरदवाडी येथे टँकर येतो. परंतु टँकरसाठी असलेले शासकीय नियम पायदळी तुडवले जात आहे. टँकरवर फलक तर नाहीच, पण जीपीएस यंत्रणाही गायब होती. याशिवाय टँकर कोठून येतो, याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ होते.
कुसडगावचे सरपंच डॉ. प्रदीप कात्रजकर म्हणाले, भोगलवाडी व सरदवाडी येथे महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होतो, पण ते कोठून आणतात याबाबत टँकरचालक सांगत नाही. त्यामुळे फलक न लावणे, लॉगबुक व जीपीएस सिस्टीमबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
जामखेड तालुक्यात ५८ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यातील ३० टँकर मोहरी तलाव, तर २८ टँकर लोणी येथील उद्भवावरून भरले जातात. येथे थ्री फेज कनेक्शन असल्याने टँकर केवळ रात्रीच भरतात. परिणामी दिवसा खेपा कमी होतात. त्यामुळे अनेक टँंकरचालक जवळच्या खासगी ठिकाणावरून पैसे देऊन पाणी भरतात व आपल्या खेपा नियमित दाखवतात. यात प्रशासनाची फसवणूक केली जात आहे.