मयताच्या नावावरील जमीन हडपली; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 01:12 PM2020-12-02T13:12:31+5:302020-12-02T13:13:30+5:30
सारोळा सोमवंशी येथील झाकीर हुसेन उलडे या मयत व्यक्तीच्या नावावरील साडेचार एकर शेतजमीन आठ जणांनी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा : सारोळा सोमवंशी येथील झाकीर हुसेन उलडे या मयत व्यक्तीच्या नावावरील साडेचार एकर शेतजमीन आठ जणांनी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शबनम जाकीर हुसेन उलडे रा. जनकवाडी, पुणे यांनी फिर्यादीवरून नामदेव सुपेकर (रा. जनकवाडी, पुणे), रहीम अकबर शेख (रा. शिरूर), देवदत्त पोपट अरवडे (रा.श्रीगोंदा), रितेश प्रेम प्रशद वाजपेयी, नागवेणी रितेश वाजपेयी (रा. हैद्राबाद) , प्रवीण अंबादास आढाव, अजित देवाराव पठारे (शिरूर) या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचे वडील जाकीर हुसेन उलडे यांच्या नावे सारोळा सोमवंशी येथे साडेचार एकर शेतजमीन आहे. जाकीर हुसेन यांचे १ मार्च २००६ मध्ये निधन झालेले आहे. असे असले तरी ही शेतजमीन त्यांच्याच नावे होती. उलडे कुटुंबीय पुण्यावरून जाऊन येऊन ही शेतजमीन कसत होते. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर उलडे कुटुंबीय सारोळा सोमवंशी येथे येऊ शकले नव्हते.
ऑक्टोबर महिन्यात मुलांच्या शिक्षणकामी ७- १२ उताऱ्याची आवश्यकता भासल्याने त्यांनी तो उतारा काढला. त्या उताऱ्यावर इतर व्यक्तींची नावे येऊन वडील जाकीर हुसेन यांच्या नावाला कंस झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या बोगस खरेदीखत केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.