ग्रामपंचायतींनी तंबाखू विक्रीला लगाम घालावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:02+5:302021-04-10T04:20:02+5:30

श्रीरामपूर : नगर येथील अन्न व औषध प्रशासनाने बेलापूर व कोल्हार ग्रामपंचायतींना पत्र पाठवून गावातील तंबाखू व गुटख्याच्या विक्रीला ...

Gram Panchayats should curb the sale of tobacco | ग्रामपंचायतींनी तंबाखू विक्रीला लगाम घालावा

ग्रामपंचायतींनी तंबाखू विक्रीला लगाम घालावा

श्रीरामपूर : नगर येथील अन्न व औषध प्रशासनाने बेलापूर व कोल्हार ग्रामपंचायतींना पत्र पाठवून गावातील तंबाखू व गुटख्याच्या विक्रीला लगाम घालण्याची विनंती केली आहे. येथे सातत्याने कारवाई करूनही अवैध धंदे थांबत नसल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त किशोर गोरे यांनी दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना हे पत्र पाठवले आहे. प्रशासनाने बेलापूर व कोल्हार येथे नुकताच छापा टाकून पानमसाला व तंबाखूचा दहा हजार रुपयांचा साठा जप्त केला होता. गेल्या दोन महिन्यांमधील ही तिसरी कारवाई असल्याने प्रशासन हादरले आहे.

याप्रकरणी मुन्ना इसाक शेख (वय ४९) व नदीम तांबोळी यांची दुकाने सील करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक आयुक्त किशोर गोरे यांनी नागरिकांना तंबाखूच्या सेवनापासून परावृत्त करण्यासाठी ग्रामपंचायतींना साकडे घातले आहे. गावचे प्रमुख या नात्याने सरपंचांनी त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी गोरे यांनी केली आहे. सुदृढ व सक्षम समाज निर्मितीसाठी दुकानदारांनी हे अवैध धंदे करू नयेत. अशा पदार्थांची विक्री कुठे होत असेल तर अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. प्रत्येक नागरिकाने ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रयत्न केल्यास गाव निश्चितच व्यसनमुक्त होईल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या आवाहनाला ग्रामपंचायत कसा प्रतिसाद देते, याकडे आता लक्ष लागले आहे.

----------

Web Title: Gram Panchayats should curb the sale of tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.