अन् ग्रामसेवकांची झाली पंचाईत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:50+5:302021-06-17T04:15:50+5:30
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व सभा ऑनलाईन होत होत्या. परंतु, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ...
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व सभा ऑनलाईन होत होत्या. परंतु, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आल्याने यावेळची सभा ऑफलाईन म्हणजे सभागृहात झाली. सभेत माधवराव लामखडे या सदस्याने नगर एमआयडीसीतील कंपन्या ग्रामपंचायतींचा कर भरत नाहीत, असा मुद्दा मांडला. त्यासाठी त्यांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या दोन ग्रामसेवकांनाही सभेला बोलावले होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनाही सभेत बोलविण्यात आले होते. मात्र, करवसुलीचा मुद्दा बाजूला राहिला व ग्रामसेवक सभेत आलेच कसे? हाच मु्द्दा चर्चिला गेला. अशा प्रत्येक विषयासाठी कर्मचारी सभेत बोलविले तर विभागप्रमुख कशाला आहेत? अशी हरकत काही जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली. त्यामुळे विभागप्रमुखही अडचणीत आले. ग्रामसेवकांनी या कंपन्यांना कराच्या पावत्याच दिलेल्या नाहीत तर कंपन्या कर का भरतील? असा खुलासाही सभेत झाला. यात हा प्रश्न उपस्थित करणारे लामखडे अडचणीत आले आणि ग्रामसेवकही. ग्रामपंचायतींच्या कारभाराची चर्चा थेट जिल्हा परिषदेत कशासाठी? अशी कुजबुज त्यानंतर सभागृहात रंगली.
---------------
महापालिकेत आगामी महापौर पदाची रणनीती आखताना सेना व राष्ट्रवादीचे गणित जुळले नाही तर दोन्ही पक्षांना भाजपची मदत घ्यावी लागेल. सेना-राष्ट्रवादीच्या फाटाफुटीच्या चर्चेने भाजप नगरसेवकांना उकळ्या फुटत आहेत. मात्र, सेना व राष्ट्रवादी भाजपला ताकास तूर लागून देत नाही. त्यामुळे मनपातील भाजप पुरती गोंधळली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी महापाैर बाबासाहेब वाकळे यांचे तोंडभरून कौतुक केले. पाणीप्रश्नाचा विषय सभेत चर्चेला येताच अमृत पाणी योजना पूर्ण करण्यासाठी महापौरांनी अपार कष्ट घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे बारस्कर म्हणाले. राष्ट्रवादीकडून महापौरांचे होत असलेले कौतुक पाहून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे उठून उभे राहिले. त्यांनीही महापौर वाकळे यांचे अभिनंदन केले. लगेच भाजपचे सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनीही ‘घरातले काम बाजूला ठेवून महापौर पाहणीसाठी जात होते’, असे सभागृहात सांगितले. सेनेला मात्र महापौरांचे हे कौतुक भावत नव्हते. सेनेचे अनिल शिंदे खाली काही टिकाटिपण्णी करीत होते. राष्ट्रवादी महापौरांचे कौतुक करत होते, तर सेना तिरकस नजरेने पाहत होती.