ग्रामसेवकासह उपसरपंच,सदस्यांना कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 04:44 PM2017-09-23T16:44:08+5:302017-09-23T16:44:32+5:30
चौदाव्या वित्त आयोगाचा भरपूर निधी असूनही खर्च करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ मांडवे (ता. पाथर्डी) येथील संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामसेवक, उपसरपंच व सदस्यांना कार्यालयात चार तास कोंडले.
तिसगाव : चौदाव्या वित्त आयोगाचा भरपूर निधी असूनही खर्च करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ मांडवे (ता. पाथर्डी) येथील संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामसेवक, उपसरपंच व सदस्यांना कार्यालयात चार तास कोंडले.
ग्रामसभा घेऊन निर्णय घेऊ असे ठरल्यानंतर ग्रामसेवक भगवान खेडकर, उपसरपंच बाळासाहेब लवांडे, ग्रा.पं.सदस्य राजू लवांडे, सदस्या सिंधूबाई लवांडे यांचे पती संभाजी लवांडे, रमेश बर्डे, विठ्ठल निर्मळ आदी स्थानबद्ध झालेल्यांची सायंकाळी उशिरा ग्रामस्थांनी सुटका करण्यात आली.
तिसगाव येथील वृद्धा नदीला सध्या भरपूर पाणी आहे. त्यामुळे दळणवळण ठप्प झाले आहे. मांडवे गावाच्या पश्चिम भागातील सुमारे एक हजार रहिवाशांचा संपर्क तुटला आहे. नदीत चार फूट पाणी असल्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे, अशा तक्रारी आहेत. चौदाव्या आयोगाचा तीन वर्षापासून निधी अखर्चित आहे. त्यातून येथे तात्पुरत्या स्वरुपात नळ्या टाकून भराव करून पूल करावा, अशी सार्वत्रिक मागणी आहे. या मागणीला सदस्यांची अनुमती आहे. परंतु हे काम आराखड्यात नसल्याचे ग्रामसेवक भगवान खेडकर सांगून वेळकाढूपणा करतात, असे संभाजी लवांडे, विठ्ठल निर्मळ यांनी सांगितले. याबाबत पंचायत समिती स्थरावर ही तक्रारी करण्यात आल्या.
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील मांडवेबरोबर जोहरवाडी, मोहोज, शिंदेवस्ती, नजनवस्ती, पिसेवस्ती, चौधरवस्तीवरील नागरिकांना या अडचणींचा त्रास होत आहे. आराखड्यात पुलाचे काम नसले तरीही ग्रामसभेने एकमुखी मागणी केल्यास तशी नव्याने नोंद करता येते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चंद्रकांत मतकर, शिवाजी लवांडे, संभाजी लवांडे, विठ्ठल निर्मळ, राजेंद्र लवांडे, श्याम कुलकर्णी, बाबासाहेब क्षीरसागर, रामभाऊ दातीर यांनी आंदोलनात भाग घेतला.