नवनागापूरमध्ये ग्रामसेवकाला बेदम मारहाण : एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:18 AM2018-09-18T11:18:52+5:302018-09-18T11:19:13+5:30
नवनागापूर येथे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात घूसून ग्रामविकास अधिकारी संजय विश्वनाथ मिसाळ यांना एकाने जबर मारहाण केली.
अहमदनगर : नवनागापूर येथे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात घूसून ग्रामविकास अधिकारी संजय विश्वनाथ मिसाळ यांना एकाने जबर मारहाण केली. याप्रकरणी मिसाळ यांनी एमआयडीसी ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी मारहाण करणारा अरूण दादा रोकडे याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
ग्रामसेवक मिसाळ हे सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करत होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अरूण रोकडे हा ग्रामपंचायत कार्यालयात घूसला आणि पाणीपुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी बाळासाहेब लक्ष्मण उगले व सुरेश आनंदराम तापडी यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी मिसाळ यांनी अरूण रोकडे याला तुमची लेखी स्वरूपात तक्रार द्या, अशी विनंती केली़ तेव्हा अरूण रोकडे याने मिसाळ यांची गचांडी पकडून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत दमदाटी केली. या घटनेची फिर्याद दाखल होताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने अरूण रोकडे याला अटक केली.