२६ जानेवारीच्या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:01 PM2018-01-16T17:01:59+5:302018-01-16T17:02:55+5:30

ग्रामसभांमध्ये दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

The Gramsevak Union's decision to boycott the 26th January Gram Sabha | २६ जानेवारीच्या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय

२६ जानेवारीच्या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामसेवक युनियनचा निर्णय

अहमदनगर : ग्रामसभांमध्ये दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे २६ जानेवारीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिला आहे. तसेच ग्रामसभांच्या दिवशी पुरेसे पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही युनियनने केली आहे.
ढाकणे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, २ आॅक्टोबर या दिवशी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती या दिवशी गावागावात ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. मात्र अशा राष्ट्रीय उत्सवांवेळी सार्वजनिक सुट्टी असल्याने ग्रामसभेला ग्रामसेवक वगळता इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. या ग्रामसभांमध्ये विकासकामांचे नियोजन, धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना या विशेष ग्रामसभा राजकीय आखाडा बनल्या आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका ग्रामसेवकांना बसत आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असतानाही ग्रामसेवक संवर्ग सुट्टीचा त्याग करून कामकाज करीत असतो. परंतु, यावेळी ग्रामसेवकांना होणारा त्रास पाहता या दिवशी होणा-या ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची गरज आहे. ग्रामसभांसाठी पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे.
३० मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून १ मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. याच पद्धतीने दुसरी ग्रामसभा ९ ते १५ आॅगस्ट दरम्यान घेणे अपेक्षित आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याच्या सूचना असल्या तरी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने नियम असूनही ग्रामसभेला इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे ग्रामसभेचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याने प्रजासत्ताक दिनी होणारी ग्रामसभा इतर दिवशी आयोजित करण्यात यावी. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनी फक्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. याबाबत शासनाने योग्य आदेश निर्गमित करावे अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनी होणाºया ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा ढाकणे यांनी दिला आहे.

Web Title: The Gramsevak Union's decision to boycott the 26th January Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.