सत्तरीतील आजोबांचा ७० रुपयांसाठी २० किलोमीटर सायकलवरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:15 AM2021-05-03T04:15:41+5:302021-05-03T04:15:41+5:30

कोपरगाव : कोरोनाने गेल्या २० महिन्यांपासून सर्वांनाच जेरीस आणले आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा ...

Grandfather in his seventies traveled 20 km by bicycle for 70 rupees | सत्तरीतील आजोबांचा ७० रुपयांसाठी २० किलोमीटर सायकलवरून प्रवास

सत्तरीतील आजोबांचा ७० रुपयांसाठी २० किलोमीटर सायकलवरून प्रवास

कोपरगाव : कोरोनाने गेल्या २० महिन्यांपासून सर्वांनाच जेरीस आणले आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा बंद आहेत. मात्र, त्याच्या कौटुंबिक गरजा सुरूच असून, त्या पूर्ण करण्यासाठी पैसाही हवाच आहे. त्यामुळे हा पैसा उपलब्ध करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील ७३ वर्षीय आजोबा आसाराम वरुबा पवार यांनी स्वतःच्या सायकलला बारदान्याची झोळी तयार केली. त्यात स्वतःच्या शेतात उत्पादित केलेला कांदा टाकून दररोज गावोगाव फिरत या कांद्याची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

आसाराम पवार हे मूळचे येवला तालुक्यातील अंदरसूल येथील आहेत. मेंढपाळाचा व्यवसाय असल्याने गेली अनेक वर्ष ते कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावामध्ये मेंढ्या घेऊन येत. १४ वर्षांपूर्वी मेंढ्यांचा व्यवसाय बंद करून धोत्रे येथेच साडेआठ एकर शेती घेतली. या आजोबांना पत्नी, एक मुलगी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. विशेष म्हणजे, आजोबांचे चारही मुले त्यांच्यातून विभक्त राहतात. म्हणजेच ७३व्या वर्षीही या आजोबा- आजीला आपला प्रपंच चालवावा लागत आहे. असलेल्या शेतीपैकी काही शेतीही मुलांना दिली, तर काही आजोबांकडेच आहे. ती शेती ते स्वतः करतात, तर कधीकधी मुलेदेखील मदत करतात.

शनिवारी ( दि. १ मे ) हे आजोबा धोत्रे येथून आपल्या सायकलच्या झोळीत कांदे घेऊन भर दुपारी रणरणत्या उन्हात सायकलवरून साधारण एका बाजूने ८ ते १० किलोमीटर अंतर कापत वारी येथे कांदा विक्रीसाठी आले. वसाहतीमध्ये सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत फिरून आजोबांनी कांदा विक्री केली. त्यातून त्यांना ७० रुपये मिळाले. यातून निदान साखर व चहापत्ती तरी सुटेल याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. याच आनंदात दुपारी १ वाजेच्या सुमारास वारीतच एका ठिकाणी थांबून सोबत आणलेल्या चटणीभाकरीवर ताव मारीत क्षणभर विश्रांती घेऊन आपल्या सायकलला टांग मारून पुन्हा आपल्या घराची वाट धरली.

.............आजोबांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी..

७३ वर्ष वय असलेल्या आजोबांनी सायकलवरून २० किलोमीटरचा प्रवास करून मिळालेल्या अवघ्या ७० रुपयांचा आनंद त्यांच्या जीवनात ऊर्जा वाढविणारा क्षण होता. याउलट लाखो रुपये कमवूनही गरजा पूर्ण होत नाही, म्हणून सतत तणावात राहून नैराश्यात राहणाऱ्या आजच्या तरुणाईसाठी या आजोबांचा ७० रुपयांसाठीचा २० किलोमीटरचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

.............

माझा जन्मच मेंढ्यामागे झाला आहे. त्यामुळे मला बालवयापासूनच कष्टाची सवय आहे. नवरा-बायकोचा प्रपंच मलाच चालवावा लागत आहे. त्यासाठी मला काम करणे भागच आहे. घरी बसलो तर कुणी जागेवर आणून देणार नाही. सायकलवरून गावोगावी जात कांदा, प्रसंगी भाजीपाला विकत असतो. महत्त्वाचे म्हणजे, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोनही डोस घेतले आहे.

- आसाराम पवार, धोत्रे, कोपरगाव

-----------------

Web Title: Grandfather in his seventies traveled 20 km by bicycle for 70 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.