ग्रामपंचायतींच्या आडून आजी-माजींचा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:26+5:302021-01-13T04:50:26+5:30
अहमदनगर : विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागल्याने भाजपाचे माजी आमदार ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलेच सक्रिय झाले आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ...
अहमदनगर : विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागल्याने भाजपाचे माजी आमदार ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलेच सक्रिय झाले आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षविस्तारासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा तालुक्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी आजी-माजी आमदारांचा संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीत नेवासा, कोपरगाव, कर्जत- जामखेड, राहुरी- नगर आणि अकोले मतदारसंघात भाजपाचा दारुण पराभव झाला. हे मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. या तालुक्यांत भाजपचे माजी आमदार आहेत. ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून गावपातळीवरील संपर्क वाढविताना दिसतात. पक्षाकडून त्यांना तशा सूचना आहेत. विशेष म्हणजे, भाजपाने माजी मंत्री गिरीश महाजन यांची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संपर्कप्रमुख म्हणून नेमणूकही केली गेली आहे. त्यांनी नगरमध्ये येऊन माजी आमदारांकडून फोनवरून नुकताच आढावा घेतला. यावेळी अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात येतील, अशी ग्वाही माजी आमदारांनी दिल्याचे समजते. भाजपकडून ग्रामपंचायतींचा आढावा घेतला जात असताना महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील मंत्री गावपातळीवर फारसे लक्ष देताना दिसत नाहीत. आमदार मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत कोण कुणाला भारी पडणार, याचीच तालुक्यांत चर्चा आहे.
जिल्ह्यातील राहाता, शेवगाव- पाथर्डी आणि श्रीगोंदा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत. परंतु, शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, पाथर्डीत प्रताप ढाकणे आणि श्रीगोंदा तालुक्यात माजी आमदार राहुल जगताप हे नेते ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय आहेत. त्यामुळे या तालुक्यांतही चुरस आहे. संगमनेर व श्रीरामपूर हे दोन तालुके काँग्रेसकडे आहेत. सेनेकडे असलेला पारनेर विधानसभा मतदारसंघ आमदार निलेश लंके यांच्या रूपाने राष्ट्रवादीकडे आला आहे. सेनेला जिल्ह्यात खातेही उघडता आलेले नाही. नगर तालुक्यात मात्र सेनेचे दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत गाडे यांनी नेहमीप्रमणे भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याविरोधात मोट बांधली आहे. सेनेकडून मंत्री झालेले शंकरराव गडाख हे नेवासा तालुक्याचे नेतृत्व करतात. त्यामुळे गडाख यांचा नेवासा तालुक्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींवर भगवा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हेही स्वत: गावोगावी फिरत आहेत. त्यामुळे नेवासा तालुक्यात चुरशीची लढती पाहायला मिळणार आहे. कर्जत- जामखेडमध्ये माजी मंत्री राम शिंदे हे गावोगावी फरत आहेत. त्यांच्याविरोधात आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे लढा देत आहेत. त्यामुळे या तालुक्यात शेवटच्या टप्प्यात आजी- माजी आमदारांतील संघर्ष पाहायला मिळणार आहे.
..
दक्षिणेत खासदार विखे यांची जादू चालणार का?
दक्षिण नगर जिल्ह्यात शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंदा या तीन तालुक्यांत भाजपाचे आमदार आहेत. अन्य कर्जत- जामखेड, पारनेर, नगर या तालुक्यांत राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मात्ऱ दक्षिणेची खासदारकी डॉ. सुजय विखे यांच्या छपाने भाजपकडे आहे. विखे यांचा गावापातळीवर थेट संपर्क असल्याने भाजपाला दक्षिणेतून मोठ्या अपेक्षा आहेत.
....