महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना पगारी रजा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:58+5:302021-05-26T04:21:58+5:30
कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्रीम म्हणून ५० हजार रुपये आणि घरी किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना ...
कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अग्रीम म्हणून ५० हजार रुपये आणि घरी किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय तसेच विम्याचे २० लाख अशी एकूण ५० लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या सर्व नियमित (प्रशिक्षणार्थी व सहायक यांच्यासह) व बाह्यस्रोत कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या वारसांचा समावेश आहे.
वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची मान्यता मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून व स्वतः संपर्क साधत आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंत २७ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यातही त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. सोबतच सर्व वीज कर्मचाऱ्यांचे जलदगतीने लसीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत ५७ टक्के वीज कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.