दोन वर्षांपासून रखडले ३२ लाखांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:21+5:302021-03-27T04:21:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कृषी विभागाच्या २०१९-२० वर्षातील मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेततळे खोदाई व राष्ट्रीय कृषी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कृषी विभागाच्या २०१९-२० वर्षातील मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेततळे खोदाई व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील शेततळे अस्तरीकरण या दोनही योजनेतील लाभार्थी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील ५९ शेतकऱ्यांचे ३१ लाख ५२ हजार रुपयांचे अनुदान दोन वर्षापासून तालुका कृषी विभागाकडे रखडले आहे. त्यामुळे शासनाकडे हे रखडलेले अनुदान यंदाच्या वर्षी तरी पदरात पडणार का? असा संतप्त सवाल लाभार्थी शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे आहेत. या सर्वच गावातील शेतकऱ्यांनी १९-२० या आर्थिक वर्षात कृषी विभागाच्या विविध योजनेत ऑनलाईन अर्ज करून सहभाग घेतला होता. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेतील १८८ शेतकऱ्यांपैकी ११ शेतकऱ्यांचे ७ लाख ७८ हजार इतके अनुदान तर मागेल त्याला शेततळे योजनेत शेततळ्यांची खोदाई केलेल्या २०२ शेतकऱ्यांपैकी ४८ शेतकऱ्यांचे २३ लाख ७६ हजार रुपये असे ३१ लाख ५२ हजाराचे अनुदान गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होताना काही महिन्यातच अनुदान मिळेल अशी आशा होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी हात उसने, दागिन्यावर कर्ज काढून या योजनेत सहभागी होण्यासाठी तरतूद केली होती. मात्र,अनुदान वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
............
मार्च एन्ड पाळणार का?
१ एप्रिल ते ३१ मार्च अशा ठरवून दिलेल्या आर्थिक वर्षात संपूर्ण वर्षातील कोणतेही आर्थिक व्यवहार हे ३१ मार्चअखेर पूर्ण करायचे असा शासनाचा नियम आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या व्यवहारात शेतकऱ्यांनी बँकेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी मार्च महिन्यात सक्ती केली जाते. प्रसंगी कारवाईचा देखील बडगा उगारला जातो. याउलट दोन-दोन आर्थिक वर्ष उलटूनही जर शेतकऱ्यांचे अनुदान मिळत नसेल तर अशा व्यवस्थेविरुद्ध कोण कारवाई करणार? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
..................
दोन्ही योजनेतील प्रलंबित अनुदाना संदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविले आहेत. हे अनुदान मिळावे, यासाठी कार्यालयीन स्तरावरून सतत पाठपुरावा सुरु आहे. शासनाकडे जसाजसा निधी उपलब्ध होतो, तसतशी अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. त्यामुळे येत्या काही दिवसात हे प्रलंबित अनुदान जमा होईल, अशी अपेक्षा आहे.
- अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव.