अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचे अनुदान अखेर बँकेत वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:20 AM2021-03-28T04:20:03+5:302021-03-28T04:20:03+5:30
करंजी : शनिवारी (दि.२७) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तत्काळ विविध ...
करंजी : शनिवारी (दि.२७) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मागील वर्षीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तत्काळ विविध बँकांकडे वर्ग करण्यात आले. येत्या दोन ते तीन दिवसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
मागील वर्षी (२०२०) तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या फळबागा, इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी करून पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले होते. परंतु, मदतीची रक्कम येऊन महिना उलटून गेला तरी अनुदानाची रक्कम रखडली होती.
याबाबत ‘लोकमत’मध्ये शनिवारी (दि.२७) वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम तालुक्यातील त्या-त्या गावाच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा व सहकारी बँकेच्या शाखेत जमा करण्यात आली आहे.
तालुक्यातील पश्चिम भागातील फळबागांचे व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
करंजी परिसरातील करंजीसह दगडवाडी, भोसे, सातवड, घाटसिरस, त्रिभुवनवाडी, देवराई, कौडगाव, जोहारवाडी, खांडगाव, लोहसर सह अनेक गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परिसरातील बँकांनी हे अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा केल्यास परिसरातील शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायट्यांचा भरणा करण्यास अडचणी कमी येतील, त्यासाठी बँकांनी तत्परता दाखवून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी सेवा संस्था अध्यक्ष बंडू अकोलकर, ग्रा. पं. सदस्य नवनाथ आरोळे, रोहित अकोलकर, बाबा गाडेकर, राजेंद्र अकोलकर, राहुल अकोलकरसह शेतकऱ्यांनी केली आहे.
---
मागील वर्षी २०२० मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम त्या-त्या बँकाकडे पाठविण्यात आली आहे. रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
-शाम वाडकर,
तहसीलदार, पाथर्डी
---
२७ करंजी न्यूज