ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्याने केली श्रम व पैसा वाचवणारी गांडूळ खत चाळणीची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:28 PM2018-11-29T12:28:49+5:302018-11-29T12:30:57+5:30
संगमनेर येथील भाऊसाहेब लहानू बोऱ्हाडे या शेतकऱ्याने गांडूळ खत आणि वाळू चाळण्यासाठी अगदी कमी खर्चात चाळणी तयार केली आहे.
- यमन पुलाटे (लोणी, जि.अहमदनगर)
अहमदनगर जिल्ह्यातील छोटेशे गाव असलेले खळी तालुका संगमनेर येथील भाऊसाहेब लहानू बोऱ्हाडे या शेतकऱ्याने गांडूळ खत आणि वाळू चाळण्यासाठी अगदी कमी खर्चात चाळणी तयार केली आहे. या चाळणीमुळे गांडूळ खत उत्पादन प्रकल्पासह बांधकाम व्यावसायिकांच्या श्रम व खर्चात मोठी बचत झाली आहे.
भाऊसाहेब बोऱ्हाडे यांनी बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न करता शेती व्यवसाय व खळी येथे पंक्चरचे दुकान सुरू केले. या दुकानासोबतच शेतकऱ्यांची गरज म्हणून शेती अवजारे दुरुस्ती करता करता त्यांनी आवड म्हणून वेल्डिंग व्यवसाय सुरू केला. यानंतर बुद्धिकौशल्य वापरून त्यांनी लिंबू बागेतील मशागतीची अवजारे तयार केली. सेंद्रिय शेतीची आवड असल्याने गांडूळ खत प्रकल्प ही केला; पण या खतातून काडी-कचरा, दगड-माती कशी वेगळी करणार ? हा प्रश्न होता.
यासाठी सुरुवातीला त्यांनी वाळू चाळणीचा प्रयोग केला; पण तो जरा त्रासदायक वाटला. म्हणून त्यांनी काहीतरी तरी वेगळे करीत लंबगोलाकार आकार देत गजाचा वापर करीत त्याला चाळणी लावून केवळ १०० ते १५० किलो वजनाची ही चाळणी तयार केली. कमी खर्चात ही चाळणी तयार केली असून याद्वारे दोन व्यक्तींना दररोज सरासरी चार टन गांडूळ खत चाळता येते. शिवाय कचरा दगड-माती आणि गांडूळ वेगळे होऊन तयार गांडूळ खत भाऊसाहेब थेट गोणीमध्ये साठवून ठेवतात.
गांडूळ खताबरोबर त्याचा उपयोग वाळू चाळण्यासाठीही केला जातो. चाळणीची साईज बदलून धान्य चाळता देखील येऊ शकते. अगदी कमी श्रमात या चाळणीद्वारे काम होत आहे. ही चाळणी त्यांनी शेतकऱ्यांना देण्याबरोबरच भाडेतत्त्वावर देखील उपलब्ध करून दिली आहे. ही चाळणी मशीन विद्युत मोटारीवर चालत असल्याने वेळ व श्रम याची मोठ्या प्रमाणावर बचत होते.