नगर पर्यटनदृष्ट्या समृद्ध करण्यास मोठा वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:26 AM2021-02-17T04:26:22+5:302021-02-17T04:26:22+5:30
अहमदनगर : अहमदनगर शहर व जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असल्याने येथे पर्यटनदृष्ट्या विकासाला मोठा वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या ...
अहमदनगर : अहमदनगर शहर व जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा असल्याने येथे पर्यटनदृष्ट्या विकासाला मोठा वाव आहे. एकत्रितपणे काम केल्यास येत्या २-३ वर्षात हे शहर आणि जिल्हा राज्य व देशात क्रमांक एकचा बनेल. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मंगळवारी नगर शहरात आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्काराने जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जि. प. सभापती मीरा शेटे, उमेश परहर, काशिनाथ दाते, सुनील गडाख आदी यावेळी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, आर. आर. आबांनी कष्टातून नेतृत्व उभा केले. गावविकासासाठी त्यांची तळमळ असल्याने त्यातून विविध योजना आकाराला आल्या आणि हजारो गावांचा कायापालट झाला. त्यामुळेच त्यांच्या स्मृतीदिनी सुंदर गाव योजनांचे पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ग्रामपंचायतींनी आता यावरच न थांबता अधिकाधिक नावीन्यपूर्ण संकल्पना गावात राबवाव्यात. सर्वांना सोबत घेत ग्रामविकासासाठी प्रयत्न केले तर महात्मा गांधींनी दिलेला खेड्यांना स्वयंपूर्ण करण्याचा मंत्र प्रत्यक्षात येईल. प्रत्येक गावाने प्राथमिक शाळेसाठी चांगली इमारत, अंगणवाडीसाठी इमारत आणि स्मशानभूमी ही कामे प्राधान्याने करावीत, असे ते म्हणाले. राजश्री घुले यांनी, ग्रामविकास क्षेत्रात गावपातळीवर विविध विकास कामे होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले. सूत्रसंचालन उध्दव काळापहाड आणि गौरी जोशी यांनी केले, तर आभार ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी मानले.
----------
या गावांचा गौरव
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सन २०१८-१९ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम - ग्रामपंचायत खडांबे खुर्द (ता. राहुरी ) आणि वाळवणे (ता. पारनेर) यांना विभागून. सन २०१९-२० मध्ये जिल्हास्तरावर प्रथम - ग्रा.पं. गणोरे (ता. अकोले) आणि आव्हाणे बु. (ता. शेवगाव) यांना विभागून. सन २०२०-२१ मध्ये जिल्हास्तरावर प्रथम - ग्रा. पं. निमगाव बु. (ता. संगमनेर) आणि खडकेवाके (ता. राहाता) यांना विभागून. तसेच सन २०२०-२१ मध्ये तालुकास्तरावर निवड झालेल्या डोंगरगाव (ता. अकोले), निमगाव बु. (ता. संगमनेर), करंजी (ता. कोपरगाव), श्रीरामपूर- जाफराबाद आणि मुठे वडगाव यांना विभागून. खडकेवाके (राहाता), सडे (राहुरी), वडाळा बहिरोबा (नेवासा), राक्षी (शेवगाव), चिचोंडी (पाथर्डी), खर्डा (जामखेड), कानगुडवाडी आणि कोपर्डी विभागून (कर्जत), मढेवडगाव (श्रीगोंदा), जामगाव (पारनेर) आणि टाकळी खातगाव (नगर) या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना ४० लाख, तर तालुका स्तरावर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचे पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
----------------
पुन्हा आम्हीच येणार...
‘पुन्हा येईन... पुन्हा येईन’ म्हणणार्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण राज्यात पुन्हा महाविकास आघाडीच सत्तेत येणार आहे, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
-------------
फोटो - १६सुंदर गाव पुरस्कार
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंगळवारी जिल्ह्/ातील २१ गावांना आर. आर. पाटील (आबा) सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.