‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : बैलजोडीची खूण धर ध्यानी गं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 02:31 PM2019-04-11T14:31:44+5:302019-04-11T14:32:26+5:30

मैलागणिक भाषा बदलते. तसेच प्रश्नही बदलतात. पण, पाणी ही एक सामायिक समस्या जिल्ह्यातील बहुतेक भागात फिरताना जाणवते

Ground Report of 'Lokmat': Take a look in village | ‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : बैलजोडीची खूण धर ध्यानी गं

‘लोकमत’चा ग्राऊंड रिपोर्ट : बैलजोडीची खूण धर ध्यानी गं

अहमदनगर : मैलागणिक भाषा बदलते. तसेच प्रश्नही बदलतात. पण, पाणी ही एक सामायिक समस्या जिल्ह्यातील बहुतेक भागात फिरताना जाणवते. नगर मतदारसंघातील वांबोरी, खोसपुरी, शिराळ हा प्रदेशही दुष्काळाच्या झळा सोसतो आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. टरबूज विकणारा एक शेतकरी वांबोरीच्या चौकात भेटला. शेतीत पाणी राहिले नाही म्हणून चिंतेत होता. वांबोरी चारी झाली. मात्र, त्यातून वांबोरी बारमाही सिंचनाखाली आलेली नाही. पाथर्डी तालुक्यातील गावांची अशी तक्रार आहे की वांबोरीला या चारीचा सर्वाधिक फायदा होतो. मात्र, वांबोरीचे शेतकरीही या चारीबाबत पूर्णत: समाधानी दिसत नाहीत.
गप्पांच्या ओघात मतदानाचा विषय निघाला. हा शेतकरी विज्ञान शाखेतील पदवीधर होता. आंतरराष्टÑीय पातळीवर काय घडामोडी सुरू आहे हे सुद्धा तो बोलत होता. शेतकऱ्याला या सरकारच्या काळात काही मिळाले नाही, अशी त्याची नाराजी होती. मात्र, मोदींच्या इतर काही धोरणांचे तो स्वागतही करत होता. आपण कुणाच्या बाजूचे आहेत हे समोरच्याला कळूच नये याची आता अनेक मतदार खबरदारी घेतात. तेच या शेतकऱ्याच्या बोलण्यातही जाणवत होते.
गावात फिरताना काच, कागद, पत्रा गोळा करणाºया काही महिला भेटल्या. आपणाला घरकूल, गॅस काहीच मिळाले नसल्याचे यातील काही महिला सांगत होत्या. काही महिलांनी मात्र गॅस मिळाल्याचे सांगितले. या महिलांपैकी काहीजणी मोदी सरकारच्या बाजूने तर काही विरोधात बोलत होत्या. एक गॅसची योजनाही लोकांचे सरकारबद्दलचे मत बनविण्यास अशी कारणीभूत ठरते. या योजना मतांसाठीच असतात की काय? असा प्रश्न त्यातून पडतो. भाजप-काँग्रेस या दोन्ही बाजूने घोषणा झाल्या व होतील. मात्र, या महिलांच्या पाठीवरील कचºयाची गोणी हटविण्यात काँग्रेसप्रमाणेच मोदी सरकारही अपयशी ठरल्याचे दिसते.
वांबोरीची व्यापारी पेठही मोठी आहे. एक कापड दुकानदार भेटले. त्यांची इंग्रजीची जाण उत्तम होती. सोबत इंग्रजी वर्तमानपत्रही होते. सुरुवातीला मोदी यांच्या काही धोरणांचे त्यांनी कौतुक केले. पण, जेव्हा ग्रामीण भागावर विषय आला तेव्हा शेतकरी नाराज असल्याचे सांगितले. जेव्हा विषय वांबोरीवर आला तेव्हा त्यांनी स्थानिक प्रश्न मांडत सर्वच पक्षांबाबत नाराजी नोंदवली. आमच्या गावात साधे वरिष्ठ महाविद्यालय आजवर होऊ शकले नाही ही त्यांची प्रमुख खंत होती. माझी पिढी गेली, पण पुढील पिढ्यांसाठी तरी गावात शिक्षणाची सोय होणार की नाही? किती दिवस आम्ही नेत्यांचा नुसता जयजयकार करायचा? त्यांना हे प्रश्न विचारणार की नाही? अशी खदखद ते बोलून दाखवत होते.
वांबोरी सोडून खोसपुरीकडे निघालो. खोसपुरीत विहिरींचे पाणी पूर्ण आटले आहे. गावाच्या चौकात उभे राहिलो तरी दुष्काळ जाणवतो. एका सलून दुकानात काही गावकरी बसले होते. एका शेतकºयाला बोलते केले. वर्षभराचा आपला आर्थिक प्रवास त्याने मांडला. त्याची पाच एकर शेती आहे. तो म्हणाला, यावर्षी सात-आठ पोते बाजरी झाली. हरभरा, ज्वारी पाण्याअभावी जळून गेली. सरकारने दोन हजार रुपये अनुदान दिले. त्यात काय होणार? त्यात मी काही पैसे टाकले व मुलांना दूध पिण्यासाठी शेळी घेतली आहे. मतदानाचा विषय काढला. तेव्हा सगळे लोक चिडीचूप झाले. ‘काहीच सांगता येणार नाही’ अशी सर्वांची एकमुखी प्रतिक्रिया होती.
खोसपुरीतून शिराळला गेलो. येथील गावकरी सांगत होते. आमच्या गावात सात पाणी योजना झाल्या. पण, तरी प्यायला पाणी नाही. येथे जनावरांची चारा छावणी सुरु आहे. तेथे दुपारी सावलीला काही शेतकरी बसले होते. तेथेच आम्ही गप्पांचा फड रंगविला. यातील काही लोक जरा बिनधास्त दिसले. न घाबरता भाजप व राष्टÑवादी या दोन्ही उमेदवारांच्या कमीजास्त बाजू काय आहेत? याचे विश्लेषण मांडत होती. अर्थात ते कुणाला मत देतील हे मात्र त्या चर्चेतून समजू शकले नाही. या गप्पांमध्ये छबुराव मुळे या निवृत्त शिक्षकांनी जुन्या काळातील काही आठवणी सांगितल्या.
पूर्वी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष यांचे वर्चस्व होते. तेव्हाच्या प्रचारात एक गुणवत्ता व सकसपणा होता असे ते म्हणाले. शाहीर अमर शेख आमच्या भागात काँग्रेसच्या प्रचारासाठी कलापथक घेऊन यायचे. ‘बैलजोडीची खूण धर ध्यानी गं, मतदानाला चल माझ्या राणी गं’ हे अमर शेखांचे गाणे त्यांना आजही आठवते.

Web Title: Ground Report of 'Lokmat': Take a look in village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.