थकबाकी भरणारांनाच शास्तीमाफीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 07:05 PM2018-04-14T19:05:36+5:302018-04-15T10:30:01+5:30
मार्चअखेर थकबाकीसह शास्ती भरणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा कोणताही लाभ मिळणार नाही. मालमत्ताकराच्या थकबाकीसह शास्ती भरली तरच माफीचा लाभ करदात्यांना मिळणार आहे. एप्रिलमध्ये कर भरणारांना आधीच तीन महिन्यांपर्यंत सवलत असते. त्यात थकबाकीदारांसाठी ७५ टक्के शास्ती माफ केल्याने मार्चपूर्वी थकबाकीचे पैसे भरलेल्या मालमत्ताधारकांवर अन्याय केल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली आहे.
अहमदनगर : मार्चअखेर थकबाकीसह शास्ती भरणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा कोणताही लाभ मिळणार नाही. मालमत्ताकराच्या थकबाकीसह शास्ती भरली तरच माफीचा लाभ करदात्यांना मिळणार आहे. एप्रिलमध्ये कर भरणारांना आधीच तीन महिन्यांपर्यंत सवलत असते. त्यात थकबाकीदारांसाठी ७५ टक्के शास्ती माफ केल्याने मार्चपूर्वी थकबाकीचे पैसे भरलेल्या मालमत्ताधारकांवर अन्याय केल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली आहे.
महापालिकेने १२ एप्रिलपासून दोन टप्प्यात शास्ती माफीची सवलत जाहीर केली आहे. १२ एप्रिल ते ११ मे या कालावधीत ७५ टक्के सवलत आणि १२ मे ते ११ जून या कालावधीत ५० टक्के सवलत दिली आहे. म्हणजे एका व्यक्तीकडे एक लाख रुपये थकबाकी आणि एक लाख रुपये शास्ती असेल तर त्याला पहिल्या टप्प्यातील कालावधीत दोन लाखांऐवजी सव्वा लाख रुपये महापालिकेला द्यावे लागतील आणि दुस-या टप्प्यात दीड लाख भरावे लागतील. व्याजावर व्याज जसे लागते, तसेच शास्तीवर शास्ती लागत नाही, तर दरमहा त्यामध्ये समाविष्ट केली जाते.
एका वर्षाला १८ टक्के शास्ती
मालमत्ताकर वसुलीसाठी एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात वसुलीचे दोन सहामाही टप्पे करण्यात आले आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत कर भरला तर त्यासाठी विशेष सवलत दिली जाते. चालू बिलाची रक्कम एप्रिलअखेर भरली तर १० टक्के आणि जूनपर्यंत भरली तर ८ टक्के सवलत दिली जाते. एक जुलैपासून दरमहा २ टक्के अतिरिक्त आकारले जातात. यालाच दंड किंवा शास्ती असे म्हटले जाते. म्हणजे मार्चनंतर भरलेल्या रक्कमेवर जुलै ते मार्च अशा नऊ महिन्यांसाठी प्रतिमाह २ टक्के मिळून वर्षाकाठी १८ टक्के दंड किंवा शास्ती आकारली जाते. दरवर्षी थकबाकी भरली नाही तर शस्तीमध्ये शास्ती अधिक केली जाते. शास्तीवर शास्ती कधीही आकारली जात नाही. ३१ मार्चपर्यंत चालू बिलाचे पैसे भरले नाही तर एक एप्रिलनंतर थकबाकीच्या रकमेवर दोन टक्के शास्ती लागू होते.
तिहेरी सवलत
चालू बिलाची रक्कम एप्रिलमध्ये भरली तर कराच्या रकमेत १० टक्के सवलत मिळणार आहे. शिवाय थकबाकीदाराला शास्तीत ७५ टक्के सवलत मिळणार आहे. सदर करदात्याने मे व जून महिन्यात रक्कम भरली तर त्याला ८ टक्के चालू बिलावर सूट अधिक शास्तीत ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांसाठी ही योजना तिहेरी सवलत देणारी ठरली आहे. आधीच सवलत असल्याने दरवर्षी एप्रिल महिन्यात नागरिकांकडून करभरणा करण्यास चांगला प्रतिसाद असतो. गतवर्षी ११ कोटी रुपये एकट्या एप्रिलमध्ये वसूल झाले होते.
‘‘एप्रिलमध्ये दिलेली शास्तीमाफी ही अत्यंत चुकीची आहे. तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगून ७५ टक्के शास्तीमाफी करणार होते, तर मग अंदाजपत्रक ६१९ कोटीचे कसे होईल?मार्चअखेर शास्तीची रक्कम भरलेल्या मालमत्ताधारकांनाही ही शास्तीमाफी लागू करावी. त्यांचे पैसे नव्या बिलात वळते करून घ्यावेत. तसेच ही शास्तीमाफी दोन महिन्यांऐवजी वर्षभर लागू ठेवावी. आयुक्तांनी मार्चमध्येच शास्तीमाफी लागू केली असती तर मोठ्या प्रमाणावर वसुली झाली असती. यापूर्वी शस्ती भरणाºयांची शास्ती माफ केली नाही, तर त्यासाठी आंदोलन उभारण्याची तयारी आहे. गतवर्षी शास्तीची रक्कम ६२ कोटी असल्याचे सांगितले होते. त्यापैकी केवळ ८ कोटीच वसूल झाले. गतवर्षी संकलितकरापोटी ५५ कोटीचे उद्दिष्ट घेतले होते, मात्र केवळ १४ कोटी रुपये वसूल झाले. वृक्षकर आणि शिक्षण कराची एकूण ४ टक्के रक्कम शासनाला द्यावी लागते. त्यामुळे यंदाच्या वसुलीचा ४१ कोटीचा आकडाही निव्वळ फेक आहे. एप्रिलमध्ये मुलांची शैक्षणिक फी भरावी लागते, अशावेळी एप्रिल महिन्यात सवलत देवून त्याचा किती लाभ होईल, ते सांगणे कठीण आहे.’’
-दीप चव्हाण, नगरसेवक
‘‘महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शंभर टक्के वसुली अपेक्षित आहे. महापालिकेच्या कारवाईच्या भितीपोटी नागरिकांनी कर्ज काढून थकबाकी भरली. त्यानंतर शास्तीमध्ये सूट दिली. ३१ मार्चपूर्वी ज्यांनी कर भरले त्यांचीही शास्ती ७५ टक्के माफ करावी. एप्रिलमध्ये पैसे भरणा-यांना सवलत आणि मुदतीआधी पैसे भरणारांना दंड, हा प्रशासनाची भूमिका प्रामााणिक मालमत्ताधारकांवर अन्यायकारक आहे.’’
-तिरुमलेश पासकंटी, नागरिक