पालकमंत्री राम शिंदे यांनी केला बसने प्रवास : कर्जत-पंढरपूर बससेवेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:46 PM2018-09-08T14:46:09+5:302018-09-08T14:46:41+5:30
कर्जत बसस्थानकाच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन आणि नवीन बससेवेच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री राम शिंदे यांना बसने प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही.
कर्जत : कर्जत बसस्थानकाच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन आणि नवीन बससेवेच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री राम शिंदे यांना बसने प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. पालकमंत्री शिंदे यांनी आज सकाळी कर्जत-पंढरपूर या बससेवेचा शुभारंभ करत वाहकाकडून १६५ रूपयांचे तिकीट घेत बसप्रवासाचा काही क्षण आनंद लुटला.
यावेळी पालकमंत्री शिंदे म्हणाले, विकास कामांद्वारे कर्जत तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. आठ दिवसात राज्य सरकार चार हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पाला मान्यता देणार आहे. यामुळे जलसंधारण खात्यामार्फत अनेक कामे होऊन महाराष्ट्रात नाही, असा तुकाईचा प्रकल्प पूर्ण होईल. बसस्थानक व बससेवा हा कर्जतचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याची ही स्वप्नपूर्ती होत आहे. यासाठी जनतेने एस. टी. ने प्रवास करून एस.टी.चे उत्पन्न वाढविल्यास आणखी गाड्या वाढविता येतील. नव्या अद्ययावत बसस्थानकात अनेक सोयीसुविधा असतील. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले, विरोधी पक्षात आमदार असताना नागपूर अधिवेशनादरम्यान शिंदे यांनी आगारासाठी आंदोलन केले होते. त्यांनीच आता पालकमंत्री म्हणून परिवहनमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक शहाणे, बाजार समितीचे सभापती श्रीधर पवार, उपसभापती प्रकाश शिंदे, पंचायत समिती सभापती पुष्पा शेळके, उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, भाजप नेते प्रसाद ढोकरिकर, शांतीलाल कोपनर, डॉ. रमेश झरकर, संपत बावडकर, नानासाहेब निकत, अंगद रूपनर, अशोक जायभाय, विजय तोरडमल, रामदास हजारे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बुद्धिवंत, खेडकर,शहाणे, बाळासाहेब पाटील, प्रा.बेरड यांची भाषणे झाली. परिवहन मंडळाचे शिवाजी देवकर प्रास्ताविक केले. प्रसाद ढोकरिकर यांनी आभार मानले.
आंदोलनात बसला दगड मारु नका
कोणत्याही आंदोलनात एस.टी.बसला दगड मारून तिचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. बसमध्ये आपली आई,बहीण, भाऊ, नातेवाईक प्रवास करीत असतात. दिलेल्या बस सुरू राहतील, यासाठी लक्ष द्या, असा सल्लाही मंत्री शिंदे यांनी दिला.