पालकमंत्र्यांचे कट्टर समर्थक राऊत उतरणार विधानसभेच्या आखाड्यात, कर्जतमध्ये महामेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:48 PM2019-09-09T14:48:21+5:302019-09-09T14:53:50+5:30
अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष नादेव राऊत यांचा कर्जत येथील संकल्प महामेळावा सुरु झाला असून, मेळाव्यापूर्वी त्यांनी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. ‘आपला माणूस, आपला आमदार’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
जामखेड : अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले कर्जत नगरपालिकेचे नगराध्यक्ष नादेव राऊत यांचा कर्जत येथील संकल्प महामेळावा सुरु झाला असून, मेळाव्यापूर्वी त्यांनी भव्य मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. ‘आपला माणूस, आपला आमदार’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे राऊत विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे हे संकेत मानले जात आहेत़ मात्र, अद्याप राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.
महासंग्राम युवा मंचच्यावतीने नामदेव राऊत यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. नामदेव राऊत यांना आमदार बनवण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या युवकांनी हा मेळावा घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीनेच मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांच्या शाखा कार्यरत करण्यात आल्या आहेत. राजकारणातील स्पर्धकांना धडकी भरविणारे आणि उच्चांकी गर्दीचे सामाजिक उपक्रम ‘महासंग्राम’ने वेळोवेळी घेतलेले आहेत. ‘देवा गृप’ नावानेही तालुक्यात राऊत यांचे मोठे संघटन आहे. सोमवारी राऊत यांची मेळाव्यापूर्वी अक्काबाई मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पहिल्या रथात राऊत यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते. दुसऱ्या रथामध्ये कर्जतच्या नगरसेविका होत्या. विविध वाद्यांच्या ठेक्यावर घोषणा देत युवक नाचत होते.
दोन्ही तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या नेत्याला आमदार बनवण्याचा चंग बांधलेल्या तरुणांकडून ‘आपला माणूस आपला आमदार’, ‘कर्जत आमची पंढरी- देवा आमचा विठ्ठल’ अशा घोषणाही रॅलीत देण्यात आल्या. सोशल मीडियावरही अशा टॅगलाईन युवा मंचकडून व्हायरल केल्या जात आहेत. नामदेव राऊत हे संकल्प मेळाव्यातील एकमेव मार्गदर्शक असून ते कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवारीचा निर्णय जाहीर करणार का, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. राऊत यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्यास पालकमंत्री राम शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत.