सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरील खरेदीला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:22+5:302021-04-13T04:19:22+5:30
शेवगाव : सोने-चांदीचे दागिने, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदी दुकाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदाही कोरोना संसर्गाच्या कारणास्तव बंद राहणार असल्याने ...
शेवगाव : सोने-चांदीचे दागिने, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदी दुकाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदाही कोरोना संसर्गाच्या कारणास्तव बंद राहणार असल्याने संबंधित व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. खरेदीचे स्वप्न बाळगलेल्या ग्राहकांचा मुहूर्त टळणार असल्याने हिरमोड झाला आहे. दुकाने ‘लॉक’ असल्याने उलाढालही ‘डाऊन’ होणार आहे.
मराठी नववर्षाचा प्रारंभ तर वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा समजला जातो. या दिवसाला विशेष महत्त्व असल्याने बहुतांश ग्राहक नवीन वस्तू खरेदीसाठी या दिवसाला पसंती देतात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारापेठेत ग्राहकांची मोठी रेलचेल पहायला मिळते. त्यातून मोठी उलाढाल होते. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडवा मुहूर्तावर दुकाने बंद राहणार असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट असेल. त्याचा परिणाम उलाढालीवर होऊन या व्यावसायिकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदी दुकाने व्यावसायिकांनी बंद ठेवली आहेत. एरव्ही गुढीपाडवा मुहूर्तावर विविध योजना, किमतीवर सूट, लकी ड्रॉ, आकर्षक भेट योजना या व्यावसायिकांकडून जाहीर करण्यात येतात. तसेच जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान दरवर्षीच्या सरासरीचा अंदाज घेऊन दुकानात मालाची खरेदी केली जाते. चोखंदळ ग्राहकही योजनांना पसंती देऊन खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी करतात. मात्र, मंगळवारी ( दि.१३ ) रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना या दुकानातील वस्तू खरेदी करता येणार नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. बाजारपेठा शांत असल्याने बांधलेली घरे, जमीन खरेदीवर त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. काेरोनामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे.
---
वह्या-पुस्तक विक्रेत्यांनाही मोठा फटका...
सुरू होणारे शैक्षणिक वर्ष लक्षात घेऊन संबंधित दुकानदारांनी वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्याची खरेदी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात करून ठेवली होती. दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी अपेक्षित, गाईड, इतर साहित्याची खरेदी केली होती. मात्र, दुकाने बंद असल्याने या मालाचे करायचे काय हा मोठा प्रश्न त्यांचासमोर निर्माण झाला आहे. यामुळे त्यांना आर्थिक फटकाही बसला आहे.