पाहुणे म्हणून येऊन करायचे चोरी : दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:37 PM2019-01-22T18:37:41+5:302019-01-22T18:38:36+5:30
लग्नसमारंभात सुटाबुटात पाहुणे म्हणून येणारे आणि संधी साधून लाखो रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्यप्रदेश येथील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़
अहमदनगर: लग्नसमारंभात सुटाबुटात पाहुणे म्हणून येणारे आणि संधी साधून लाखो रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या मध्यप्रदेश येथील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ही टोळी दरोड्याच्या तयारीत असताना एलसीबी पथकाने सोमवारी मध्यरात्री शिर्डी येथील निघोज फाटा परिसरात सापळा लावून सहा जणांना ताब्यात घेतले़
दिलीप मानसिंग सिसोदिया (वय ३०), नवीन प्रेमनारायण भानेरिया(वय ३२), मोहनसिंग गोपालसिंग सिसोदिया(वय २२), प्रदिप मानसिंग सिसोदिया (वय २०), अशिषकुमार अनूपसिंग छायन (वय २०) व अभिषेक विनोद सिसोदिया (वय २०) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत़ या टोळीकडून दोन कार, एक तलवार, एक सत्तूर, चार लाकडी दांडे, मोबाईल, ६ तोळे सोने असा १० लाख १ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ या आरोपींना पुढील कारवाईसाठी शिर्डी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ या टोळीने ३० डिसेंबर रोजी शिर्डी येथे लग्नसमारंभातून ५५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते़ याचे सीसीटिव्ही फुटेज पोलीसांना मिळाले होते़ तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी या टोळीने चोरी केल्याचा पोलीसांचा संशय आहे़
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार, सहाय्यक निरिक्षक सचिन खामगळ, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेक, पोलीस हेड कॉस्टेबल मनोज गोसावी, सुनील चव्हाण, पोलीस नाईक शंकर चौधरी, अण्णा पवार, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, योगेश गोसावी, रविंद्र कर्डिले आदींच्या पथकाने ही कारवाई केली़
पचौरमध्ये दरोडेखोरांचे ट्रेनिंग सेंटर
मध्यप्रदेश राज्यातील पचौर (जि़ राजगड) या तालुक्यातील कडिया, सासी, गुलखेडी, पिपलिया या गावांमध्ये प्रत्येक घरातील मुलांना चोरीचे प्रशिक्षण दिले जाते़ या ठिकाणी स्थायिक असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या एखाद्या कंपनीसारखे प्रशिक्षित चोर तयार करून त्यांना चोरीसाठी मार्केटमध्ये पाठविले जाते़ प्रशिक्षित मुलांना टोळीप्रमुख एक वर्षासाठी करारतत्वावर घेतो़ यासाठी तो त्या कुटुंबाला वर्षाला ४ ते १० लाख रूपये देतो़ पुढे त्या मुलाची किमत त्याच्या चोरी करण्याच्या क्षमतेवरून ठरविली जाते़