गुजरातप्रमाणेच पंतप्रधानांनी महाराष्ट्राचीही पाहणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:20 AM2021-08-01T04:20:58+5:302021-08-01T04:20:58+5:30
नेवासा (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुजरातला गेले होते. तशीच पाहणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातही ...
नेवासा (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुजरातला गेले होते. तशीच पाहणी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातही यावे. हजार कोटींची मदत येथेही द्यावी. मात्र तसे होत नाही, अशी खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शनिशिंगणापूर (ता.नेवासा) येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी सकाळी राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर अध्यक्षस्थानी होते. मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.
त्यानंतर सोनई येथील मुळा एज्युकेशनच्या आमराईत झालेल्या शिवसंवाद बैठकीवेळी ते बोलत होते.
राऊत म्हणाले, पुढील काळाची गरज ओळखून ठिकठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकीच हा एक प्रकल्प गडाख यांच्या पुढाकारातून झाला आहे. मंत्री गडाख शिवसेनेत आल्यापासून नगर जिल्ह्यातील शिवसेनेला बळ मिळत आहे. हे सरकार तीन वर्षे टिकणार आहे. त्यामुळे तोपर्यंतही कुणी पुन्हा येण्याची शक्यता नाही. एवढेच नाही तर पुढील काळातही हे समीकरण कायम राहू शकते. आघाडीत समन्वय नसल्याचा आरोप केला जातो. त्यात तथ्य नाही. याचे उत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले आहेच, असेही त्यांनी सांगितले.
सरकार चालविण्यासाठी एकत्र आलो आहोत, पक्ष एकत्र चालविण्यासाठी नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मागील सरकारमध्येही शतप्रतिशतच्या घोषणा दिल्या जात होत्याच. सरकार आपले काम करीत आहे. विरोधक मोकळे असतात. त्यामुळे त्यांचे डोके मोकळे असते. त्यातून ते काहीही आरोप करतात, असाही टोला राऊत यांनी लगावला.
गडाख म्हणाले, दोन वर्षांत अतिवृष्टी, कोरोना संकट आले. मात्र या काळात प्रामाणिक मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना ओळखतो. फक्त पॅकेज जाहीर न करता दिलासा देण्याचे काम करणार हे वाक्य राज्यातील जनतेला विश्वास देणारे आहे. यावेळी माजी आमदार विजय औटी, भाऊ कोरेगावकर, रावसाहेब खेवरे, महापौर रोहिणी शेंडगे, सुहास वहाढणे, शशिकांत गाडे, भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र दळवी आदी उपस्थित होते.
---
भगव्यासाठी मी पुन्हा पुन्हा येईल..
नगर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी 'मी पुन्हा येईल' असे म्हणणार नाही. मात्र नम्रपणे सांगतो शिवसेनेच्या भगव्यासाठी नक्कीच पुन्हा पुन्हा येईल. कितीही नारायण राणे आले आणि गेले तरी पक्ष ताठ मानेने उभाच आहे, असे सांगून खासदार राऊत म्हणाले, शिवसेना हा वाघाचा पक्ष म्हणून जन्माला आला असल्याने प्रत्येक काम आणि भूमिका वाघासारखीच राहणार आहे.
----
३१ सोनई गडाख
शनिशिंगणापूर येथे ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संजय राऊत, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व इतर.