दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबराव डेरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 08:23 AM2021-01-24T08:23:33+5:302021-01-24T08:25:06+5:30
पारनेर (जि. अहमदनगर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नेते गुलाबरावडेरे यांचे आज आजाराने निधन झाले ते 65 वर्षांचे होते. उपचारादरम्यान पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात 1956 साली जन्म झालेल्या गुलाबराव डेरे यांचे जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण झाले होते ते 1968 सालापासून दुग्ध व्यवसायात कार्यरत होते. तालुक्यातील पहिला संकरीत गोपालनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. वडगाव आमली येथील सहकारी दूध संस्थेचे अध्यक्षपद ते तालुका दुध संघाच्या उपाध्यक्षपदी ही त्यांनी भूषविले होते.
अल्पशिक्षित असतानादेखील दूध उत्पादक व शेतकरी वर्गाविषयी त्यांचा प्रचंड अभ्यास होता. दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांनी शासन दरबारी वारंवार मोठा पाठपुरावा केला होता. दुधाच्या प्रश्नासंदर्भात गुजरात राज्याचा अभ्यास दौरा करून त्यांनी तो अहवाल महाराष्ट्र राज्य शासनाला सादर केला होता.
स्व गुलाबराव डेरे यांच्या दुधाच्या प्रश्नाविषयीची तळमळ पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांची जवळीक झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी डेरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.आजतागायत ते संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सूचनेनुसार त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती.
गेल्या तीन-चार वर्षांपासून गुलाबराव डेरे हे किडनी विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यात डायलिसिसचे उपचार सुरू होते. मात्र, तरीही शेतकऱ्यांना प्रति असलेल्या आत्मियतेमुळे अगदी अलीकडच्या कोरोनाच्या काळातही त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता पारनेर तालुक्यात झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. शिक्षक नेते भाऊसाहेब डेरे,निवृत्ती डेरे यांचे ते बंधू होत. आज उशिरा पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने शेतकरी नेता हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.