टंचाईग्रस्त गुंडेगाव होणार पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:20 AM2021-05-23T04:20:17+5:302021-05-23T04:20:17+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव नेहमीच तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव. या गावात अनेक कामे जलसंधारणाच्या ...
केडगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव नेहमीच तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव. या गावात अनेक कामे जलसंधारणाच्या कामातून हाती घेतले असून, गाव लवकरच पाणीदार होणार आहे. या गावाला गतिमान पाणलोट अभियानाबरोबर वन क्षेत्रातील माती, बंधारे वरदान ठरणार आहेत. यामुळे पीक पद्धतीला खरीप, रब्बी हंगामाला बळकटी मिळणार असून, गावातील शेतकऱ्यांचे जीवनमानही त्यातून उंचावण्यास मदत होणार आहे.
गुंडेगाव हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे गाव. गावात सरासरी ६०० ते ७०० मिलिमीटर पाऊस पडतो. पूर्वी पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविले जात नसल्याने गावात नेहमी पाणीटंचाई भासायची. उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागे. कसाबसा खरीप हंगाम साधायचा. रब्बी हंगाम मात्र वाया जायचा. शेतकरी कायम अडचणीत असायचा. यावर उपाय शोधून वन विभागाच्या माध्यमातून ८१६ हेक्टर वनक्षेत्रात पाणी व्यवस्थापनातूनच कायापालट मिळणार आहे. पडणारे पाणी जमिनीत मुरविणे, हा त्यातील मुख्य पर्याय असून, गावाच्या वनक्षेत्रात जलसंधारणाची कामे हाती घेतली असून, संपूर्ण गावाचा शाश्वत विकास होणार आहे. उपसरपंच संतोष भापकर यांनी ग्रामस्थांना याबाबतचे महत्त्व पटवून दिले.
येत्या पावसाळ्यात वन विभागाच्या माध्यमातून ३५ लाख रुपयांचे बंधारे व डीप सीसीटीची कामे गावाला पाणीदार बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. गावास पंच टेकडी व चौरा डोंगर तसेच मध्यम उंचीच्या डोंगरांची देणगी आहे. याच डोंगराच्या कुशीतून शुढ्ळेश्वर नदीचे पाणी अडविण्याची साधने नव्हती. त्यामुळे पाणी वाहून जात होते. २०१५ मध्ये वनराई बंधारे उभारणी करण्याचे काम हाती घेतले. हाच निर्णय गाव पाणीदार होण्यास ‘टर्निंग पॅाइंट’ ठरले.
उपसरपंच संतोष भापकर, सतीश चौधरी यांच्या उपस्थितीत वनक्षेत्रात वाघदरा भागातील वनक्षेत्रात माती बंधाऱ्याचा नारळ फोडून नुकताच प्रारंभ करण्यात आला. उद्योजक शंकर भापकर, कोंडिबा भिसे, विशाल पिंपरकर, खंडू भिसे, राजेंद्र पिंपरकर, मकरंद भिसे, वन कर्मचारी कचरू भापकर, ठेकेदार गुंड, बापू बेरड उपस्थित होते.
---
यापुढेही गुंडेगाव हद्दीत भरीव कामे..
पुढील काळात गुंडेगाव वनहद्दीमध्ये जलसंधारणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल व कामे गुणवत्तापूर्ण केली जातील, असे जिल्हा वनसंरक्षक सुनील पाटील, नगर तालुका वनसंरक्षक अधिकारी सुनील थिटे यांनी सांगितले.
220521\img-20210522-wa0183.jpg
गुंडेगाव फोटो