गुरुपौर्णिमेनिमित्त साईनगरीत भाविकांची गर्दी, व्हीआयपी दर्शन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 11:16 AM2019-07-16T11:16:37+5:302019-07-16T11:38:13+5:30
शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत.
शिर्डी - शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. मंगळवारी (16 जुलै) उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरू मानणारे हजारो साईभक्त आज बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असल्याने सशुल्क दर्शन व व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
साई संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, डॉक्टर आकाश किसवे संस्थांचे सुरक्षा प्रमुख गंगावणे व शिर्डी व मंदिर सुरक्षेचे पोलीस गर्दी व्यवस्थापनासाठी परिश्रम घेत आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे.
शिर्डीत साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला गुरूपौर्णिमा आनंदाने, मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो आहे. तीन दिवस हा उत्सव शिर्डीत सुरू असतो. मंगळवारी सकाळी बाबांच्या काकड आरतीने उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. साईबाबांच्या पादूका आणि फोटोची मिरवणूक आज काकड आरतीनंतर निघाली. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण मानवतेला प्रेरणा देणारा आहे. शिर्डीत सर्वधर्मसमभावाचं अद्भुत स्वरुप पाहायला मिळतं. सर्व पंथांचे लोक साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात.
साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमली असून अतिशय भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. हजारो भाविक आपल्या गुरू चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल होत आहेत. साईसंस्थानाकडूनही भक्तांच्या सुविधेसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था, भोजन, प्रसाद तसेच सुरक्षेच्या काळजीसह दर्शनासाठी उत्तम व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अमेरिका येथील एका साईभक्ताच्या देणगीतून साईमंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. तर मुंबई येथील द्वारकामाई भक्त मंडळाने साई मंदिर आणि परीसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर दरवर्षी रात्रभर उघडे ठेवण्यात येते. मात्र आज चंद्रग्रहण असल्याने रात्री साईबाबांची आरती झाल्यानंतर साईमंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे दरवर्षी मध्यरात्री दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आज दिवसभरातच बाबांचे दर्शन घ्यावे लागणार आहे.