... अन् जीवाच्या आकांताने गुरुजी पळाले; राहुरीत शाळाबाह्य मुलाने केला कोयता घेऊन पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 05:23 PM2017-11-13T17:23:36+5:302017-11-13T17:31:55+5:30
शिक्षकांवर असलेल्या अनेक जबाबदा-यांपैकी एक असलेली जबाबदारी म्हणजे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे.. राहुरीतील एक शिक्षक आरडगाव येथे उसाच्या शेतात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करीत होते. त्याचवेळी एक शाळाबाह्य मुलगा कोयता घेऊन त्या शिक्षकाच्या मागे लागला अन् या गुरुजीवर जीवाच्या आकांताने पळ काढण्याची वेळ आली.
राहुरी : शिक्षकांवर असलेल्या अनेक जबाबदा-यांपैकी एक असलेली जबाबदारी म्हणजे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे.. राहुरीतील एक शिक्षक आरडगाव येथे उसाच्या शेतात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करीत होते. त्याचवेळी एक शाळाबाह्य मुलगा कोयता घेऊन त्या शिक्षकाच्या मागे लागला अन् या गुरुजीवर जीवाच्या आकांताने पळ काढण्याची वेळ आली. ही घटना सोमवारी घडली.
ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यामुळे राहुरी तालुक्यातील ऊस पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बाहेरून कुटुंबे येऊन स्थिरावली आहेत. ऊसतोडणी मजुरांची अनेक मुले शाळाबाह्य असतात. त्यांना शाळेत आणले पाहिजे, या विचाराने जिल्हा परिषदेच्या आरडगाव येथील शाळेतील शिक्षक राजू उदमले हे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ऊसतोडणी कामगारांच्या कोप्यावर गेले. तेथे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊ लागले. कुणी शाळाबाह्य मुले आहेत का? याची चौकशी त्यांनी तेथे केली. त्यानंतर एक मुलगा शाळाबाह्य असल्याचे त्यांना सांगण्यात आले. गेवराई येथील ऊसतोडणी कामगाराचे हे कुटुंब होते. मुलाला शाळेत पाठविण्याची विनंती राजू उदमले हे त्या ऊसतोडणी कुटुंबाला करीत होते. त्याचवेळी त्या शाळाबाह्य मुलाने एक मोठा दगड त्या राजू उदमले यांना मारण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मुलाच्या आईने त्याला रोखले़ दगड उचलू दिला नाही. त्याकडे दुर्लक्ष करीत राजू उदमले यांनी त्या शाळाबाह्य मुलास शाळेचे महत्त्व समजावून सांगत शाळेत येण्याची सूचना केली. मात्र, त्या मुलाने आपल्या झोपडीकडे धाव घेत झोपडीतून कोयता आणला. तो आपल्याच दिशेने पळत येत आहे, हे लक्षात येताच शिक्षक राजू उदमले हे तेथून पळू लागले. ते पाहून तो मुलगाही उदमले यांच्या पाठीमागे पळू लागला. हे दृश्य पाहून तेथील काही लोकांनी त्या मुलाला पकडले अन् राजू उदमले या शाळाबाह्य मुलाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
एकही मुलगा शाळाबाह्य राहू नये, यासाठी घरोघर फिरून पाय दमवणा-या शिक्षकांना पायात गोळे येईपर्यंत पळावे लागू शकते, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण जीवावर बेतू शकते, याची प्रचिती सोमवारी राजू उदमले यांना आली. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.