गुरूजी देत आहेत कोरोनाचे धडे; शेवगावात तीस हजार विद्यार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 01:54 PM2020-05-02T13:54:33+5:302020-05-02T13:55:13+5:30
शेवगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींनी सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृतीचे धडे देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून ३० हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत.
अनिल साठे।
शेवगाव : तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींनी सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृतीचे धडे देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत. एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी जागृती होत आहे, तर दुसरीकडे नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मुलांच्याही कल्पनांना पालवी फुटली आहे. या माध्यमातून ३० हजार विद्यार्थी जोडले गेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समितीचे सभापती क्षीतिज घुले यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभाग हा उपक्रम राबवत आहे. यामुळे विद्यार्थी व पालक यांच्यात जनजागृती होवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होत आहे. तालुक्यातील १७ केंद्र प्रमुख, २८ मुख्याध्यापक व ७३० शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
तालुक्यातील २२७ जिल्हा परिषद शाळेतील सुमारे तीस हजार विद्यार्थी व पालकवर्ग ४४५ व्हॉटस अॅप ग्रूपच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. विशेष बाब म्हणजे विद्यार्थी व पालक या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवत आहेत.
कोरोनाविषयी घ्यावयाची काळजी, दक्षता यासंबंधी शिक्षक संदेशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह पालकांनाही धडे देत आहेत. याच बरोबर केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक हे आपल्या कार्यक्षेत्रातील किमान दहा पालकांना दररोज फोनवर संपर्क साधून माहिती देत आहेत.
विद्यार्थी रांगोळी, चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, कविता, हस्ताक्षर अशा स्पर्धामध्ये सक्रीय
सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवत आहेत. या विविध स्पर्धेत पहिल्या तीन विजेत्यांना राजश्री घुले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपाध्यक्ष प्रताप शेळके, शिक्षणअधिकारी रमाकांत काटमोरे, शेवगाव पंचायत समितीच्या उपसभापती नूतन भोंगळे, सर्व जिल्हापरिषद सदस्य, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, नायब तहसिलदार भानुदास गुंजाळ, मयूर बेरड तसेच गट विकास अधिकारी डोके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे.
शेवगाव तालुक्यात,जिल्हा परिषदमधील २२७ शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हॉटस अॅपग्रुपच्या माध्यमातून कोरोना आजाराबाबत जनजागृती केली जाते. कोरोना जनजागृती स्पर्धेत विद्यार्थी मोठया प्रमाणात सहभागी होत असून, विद्यार्थी मुक्तपणे अभिव्यक्ती करतात, असे शेवगावचे गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांनी सांगितले.