ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 08:35 PM2018-07-07T20:35:14+5:302018-07-07T20:35:31+5:30

पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला.

Gyanoba Mauli Tukaram Ganatra Vaishnava's Range | ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण

ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण

नेवासा : पंढरीच्या वाटेने चाललेल्या श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पायी दिंडीचा पावसाच्या सरींमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा अभूतपूर्व गर्दीत व हरिनामाच्या गजरात पार पडला. या दिंडीचे फटाक्यांच्या आतषबाजीने व तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले.

हरिनामाचा गजर करत दुपारी नेवासा येथे बस स्थानक प्रांगणात दिंडीचे आगमन झाल्यानंतर आगार व्यवस्थापक प्रियंका उन्हवणे यांनी गुरुवर्य याभास्करगिरी बाबांचे स्वागत केले.त्यावेळी उपस्थित चालक, वाहक व कर्मचाऱ्यांनी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा केली.

यावेळी राज्यातील पहिल्या रिंगण सोहळयास "ज्ञानोबा माऊली तुकाराम"च्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात सुरुवात झाली. सर्वप्रथम वारकऱ्यांचे रिंगण सादर करण्यात आले. त्यानंतर झेंडेकरी पथकाचे रिंगण व घोड्यांचे अश्व रिंगण सादर झाले या रिंगण सोहळ्याने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी बदामबाई विद्यालयातील विद्यार्थिनींनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर केले.तसेच सारंगधर पानकडे यांनी शिवरायांची वेशभूषा केली होती.

प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार उमेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, नायब तहसीलदार नारायण कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, दादासाहेब गंडाळ, सोपान गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर या बस सेवेचा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. देवगड दिंडी ग्रामप्रदक्षिणेसाठी नेवासा नगरीत आली असता खोलेश्वर मंदिर चौकामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचा सत्कार केला. नगरपंचायत चौकात उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व सर्व नगरसेवकांनी दिंडीचे स्वागत केले. दुर्गादेवी मंदिरात गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी दर्शन घेतले यावेळी पुजारी सुभाष चव्हाण व दुर्गादेवी तरुण मंडळाचे अजय पठाडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये मुक्कामास आली असता येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे संतपूजन केले. यावेळी महाआरती करण्यात आली.

गुरुवर्य भास्करगिरी महाराज 
भरपूर पाऊस पडू वृक्षवल्ली फुलू दे,नद्या ओढे नाले खळखळून वाहू दे,बळीराजा सुखी होऊ दे,अशी प्रार्थना त्यांनी यावेळी विठुरायाच्या चरणी केली.शेतकऱ्यांना बळीराजा म्हटले जाते पण त्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे.कर्जमाफी नको मात्र त्यांना वीज आणि पाणी मोफत दया अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हरिनामाचा गजरात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी रिमझीम पडणाऱ्या पावसाच्या सरीत शहरातून ग्रामप्रदक्षिणा केली. त्यावेळी चौकाचौकात सादर झालेले अश्वनृत्याने उपस्थितांची मने जिंकली..

Web Title: Gyanoba Mauli Tukaram Ganatra Vaishnava's Range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.