ऑनलाइन अभ्यासामुळे मोडली लिखाणाची सवय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:25+5:302021-03-28T04:19:25+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यासाची सवय मुलांना लागली असली तरी लिखाणाची सवय मात्र कमी झाली आहे. त्यामुळे लिखाणाचा वेग ...
अहमदनगर : कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यासाची सवय मुलांना लागली असली तरी लिखाणाची सवय मात्र कमी झाली आहे. त्यामुळे लिखाणाचा वेग मंदावण्यासह हस्ताक्षर बिघडण्याच्या समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्वच शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. या काळात बहुतांश अभ्यास ऑनलाइनच देण्यात आला. परंतु या ऑनलाइन अभ्यासाचे काही दुष्परिणाम नंतरच्या काळात समोर येऊ लागले. यात सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांचा लेखनाचा वेग मंदावला तसेच अनेक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडले. आतापर्यंत ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांच्याही लक्षात येत नव्हती, मात्र आता परीक्षा देण्याची वेळ आली तेव्हा विद्यार्थ्यांना ही समस्या जाणवत आहे. हीच बाब लक्षात घेऊन दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा मंडळाने काही वेळ परीक्षेसाठी वाढवून दिला आहे. वेळ वाढवून देऊन मंडळाने विद्यार्थ्यांची तात्पुरती सोय केली असली तरी विद्यार्थ्यांनी कमी झालेला वेग पुन्हा वाढवण्यासाठी लिखाणाचा सराव केलाच पाहिजे. पालकांनी आणि शिक्षकांनी ते कटाक्षाने करून घ्यावे, अशा प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.
दुसरीकडे ऑनलाइन अभ्यासासाठी विद्यार्थी हव्या त्या ठिकाणी बसतात त्यातून लिखाणाची बैठक राखली जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या लिखाणावर परिणाम झालाच शिवाय अनेकांना पाठदुखी, हातदुखीचा त्रासही जाणवू लागला आहे.
------------
हस्ताक्षर सुधारण्यासाठी हे करा
मुलांनी आपल्या पाठ्यपुस्तकातील दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहून ते पालकांना किंवा शिक्षकांना दाखवावे.
शुद्धलेखन लिहिताना वेळेचे भानही हवे. त्यामुळे घड्याळ जाऊन शुद्धलेखन लिहावे. त्यातून लिखाणाचा वेग राखला जाईल. पालकांनी आणि शिक्षकांनी जाणीवपूर्वक शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे. लिखाण करत असताना मुलांची बैठक व्यवस्थित हवी. शक्यतो स्टडी टेबलवर बसावे किंवा लिहिताना हाताखाली सपाट वस्तू घ्यावी.
- राजू बनसोडे, शिक्षक तथा हस्ताक्षर मार्गदर्शक
---------------
प्रत्येकाचे हस्ताक्षर सुंदर असायलाच हवे. त्यासाठी सराव असलाच पाहिजे. साधारण पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा सराव लॉकडाऊनमध्ये कमी झाला. पालकांनी, शिक्षकांनी यात लक्ष देऊन तो पुन्हा करून घ्यावा. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी लिखाणाच्या सरावाकडे लक्ष देऊन परीक्षेची तयारी करावी.
- डॉ. कैलास दौंड, शिक्षक कथा ज्येष्ठ कवी
--------------
विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर कमी करून पुस्तक वाचन केले पाहिजे. या वाचनामधूनच त्यांनी लिखाणाचाही सराव करायला हवा. लिखाणाचा सराव असेल तर हस्ताक्षरही आपोआप सुधारेल.
- संदीप वाघमारे, प्राथमिक शिक्षक, संवत्सर (ता. कोपरगाव)
-----------
मुलांचा ऑनलाइन क्लास बराच वेळ चालतो. ऑनलाइन क्लास सुरू असताना शिक्षक लिहायला सांगत नाहीत. नंतर मात्र विद्यार्थी लिहिण्यास टाळाटाळ करतात. वर्गात जसा लिखाणाचा सराव होतो तसा घरी होत नाही.
- प्रशांत गहिले, पालक
-------------
ऑनलाइन अभ्यासात मुलांना एक तर काही समजत नाही. शिक्षक काय सांगतात यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ निघून जातो. नंतर पुस्तकातून लिखाण करण्याकडे मुलं कानाडोळा करतात.
-सुरेखा वैरागर, पालक