हळगाव, आघी परिसराला चक्रिवादळाचा तडाखा : लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 05:48 PM2019-06-05T17:48:58+5:302019-06-05T17:49:32+5:30
जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी परिसरात मंगळवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले.
हळगाव : जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी परिसरात मंगळवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. वीज पडून तीन जनावरे दगावले. वादळामुळे शेतक-यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
हळगाव व आघी या दोन गावांना मंगळवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत वादळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. या वादळामुळे सगळीकडे दाणादाण उडाली होती. पावसापेक्षा चक्रीवादळाची तीव्रता मोठी होती. वाादळामुळे हळगाव व आघी या दोन गावांमधील चारा छावण्यांमध्ये वीज कोसळून तीन जनावरे दगावली. छावण्यांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले. छावण्यांमध्ये अवकाळी पावसामुळे हाल होऊ नयेत याकरिता बहूतांश शेतकरी आपली जनावरे घरी घेऊन जाण्याच्या मनस्थितीत आहेत. मंगळवारी रात्री काही शेतकर्यांनी आपली जनावरे पाऊस उघडल्यानंतर घरी घेऊन जाणे पसंद केले. चारा व पाण्याचा परिसरात ठणठणाट असल्यामुळे जीवाची पर्वा न करता पशुपालकांना नाईलाजाने जनावरांंसह छावण्यांमध्येच थांबण्याची वेळ आली आहे.
वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पंचायत समितीचे गटविकासाधिकारी रूपचंद जगताप, कामगार तलाठी प्रफुल्ल साळवे, ग्रामसेवक विश्वनाथ खेंगरे, ग्रामसेवक सचिन गदादे, यांचा समावेश असलेले पथक बूधवारी सकाळी हळगाव गावात दाखल झाले होते.
हळगाव येथील चारा छावणीला या पथकाने भेट दिली. या छावणीतील शेतकरी शिवाजी शहाजी ढवळे यांची एक गाय व एक बैल वीज कोसळून ठार झाले होते. घटनास्थळाची महसुल पथकाने पाहणी केली. यावेळी पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार शिवाजी ढवळे यांचे तब्बल 80 हजाराचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. हळगाव गावातीलच नानासाहेब लक्ष्मण ढवळे यांच्या राहत्या घरालाही वादळाचा तडाखा बसला यात घरासह घरातील भांडे व संसार उपयोगी साहित्यांचे भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. एकनाथ आश्रू तांबे या शेतकर्याच्या घरावरील 14 पत्रे उडून गेले. वादळामुळे घराची भिंत पडली असून घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
आघी गावालाही चक्रिवादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वार्यासह आलेल्या अवकाळी पावसात सीना ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित चारा छावणीत वीस कोसळून हनुमंत भाऊ तेरकर या शेतकयार्ची 40 हजार रुपए किमतीची खिलारी गाय ठार झाली. तसेच आघी गावातील बोराटे वस्ती परिसरातही चक्रीवादळाने मोठे नुकसान केले. या भागातील विजेचे अनेक खांब कोसळले आहेत. या वादळात मोहन नारायण बोराटे या शेतक-याच्या घरावरील 9 पत्रे उडून गेले तसेच सदाशिव सजेर्राव बोराटे यांच्या घरावरील 13 पत्रे उडून गेले. आघी गावातील नामदेव राजेंद्र गावडे या शेतकर्याच्या घरावरील 10 पत्रे उडून गेले. बाबासाहेब पोपट इंगळे यांच्या घरावरील 10 पत्रे उडून गेले. तसेच राजेंद्र मणिक पुढाईत यांच्या घरावर शेजारच्या घरावरील अँगल उडून पडल्याने दोन पत्र्यांचे नुकसान झाले तर द्वारकाबाई मणिक पुढाईत यांच्या घराची भिंत वादळामुळे पडली. ज्या शेतकर्यांच्या घरावरील सर्वच्या सर्व पत्रे उडून जाण्याची घटना घडली त्या परिसरात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.
तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्या पथकाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून गेल्यानंतर कामगार तलाठी व ग्रामसेवक यांनी तातडीने पंचनामे पुर्ण करत जामखेड तहसिल कार्यालयाला अहवाल सादर केला.