छावणी चालकांना मिळणार निम्मी रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 01:06 PM2019-05-10T13:06:43+5:302019-05-10T13:07:05+5:30

जनावरांच्या छावणीसाठीचे अनुदान शासनाने मंजूर केले असून नगर जिल्ह्यातील ४९१ छावण्यांसाठी ४६ कोटी ८१ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

Half the amount of money received by the camp operators | छावणी चालकांना मिळणार निम्मी रक्कम

छावणी चालकांना मिळणार निम्मी रक्कम

अहमदनगर : जनावरांच्या छावणीसाठीचे अनुदान शासनाने मंजूर केले असून नगर जिल्ह्यातील ४९१ छावण्यांसाठी ४६ कोटी ८१ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र अद्याप छावणी चालकांकडून बिले सादर न झाल्याने त्यांना निम्मी रक्कम (अ‍ॅडव्हान्स) दिली जाणार आहे. सात तालुक्यांची ही रक्कम २३ कोटी ८० लाख रूपये होते.
जिल्ह्यात चारा व पाणीटंचाई असल्याने शासनाने छावण्या सुरू केल्या. सहकारी, खासगी, तसेच सामाजिक संस्थांच्या नावे या छावण्या सुरू झाल्या. सद्यस्थितीत ४९१ छावण्या जिल्ह्यात सुरू असून त्यात लहान-मोठे ३ लाख ७ हजार ७४१ जनावरे दाखल आहेत. प्रारंभी छावणीचालकांना शासनाकडून लहान जनावरासाठी दररोज ३५, तर मोठ्या जनावरासाठी ७० रूपयांचे अनुदान मिळत होते. १ एप्रिलपासून यामध्ये वाढ होऊन ते अनुक्रमे ४५ व ९० रूपये करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने छावण्या चालवणे मुश्कील झाले होते. छावणीचालकांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार अनुदानाची मागणी केलेली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४६ कोटी ८१ लाख रूपयांची मागणी केली. त्यास मान्यता मिळून ४ एप्रिल रोजी ४६ कोटी ८१ लाख २१ हजार ९९ रूपयांचा निधी नगरसाठी प्राप्त झाला.
१५ एप्रिलअखेर सुरू असणाऱ्या छावण्यांसाठी हे अनुदान आहे. छावणीचालकांकडून बिले मागवून ही रक्कम संबंधित संस्थेच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र अद्याप छावण्यांचे बिले न आल्याने त्यांना या रकमेतील ५० टक्के रक्कम तातडीने अदा केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनुदान नसल्याने छावणीचालक आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांना या रकमेमुळे दिलासा मिळणार आहे. उर्वरित रक्कम अंतिम बिले आल्यानंतर व छावण्यांना झालेला दंड वजा करून दिली जाणार असल्याचे टंचाई शाखेकडून समजले.

 

Web Title: Half the amount of money received by the camp operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.