श्रीगोंद्यात ठेवीदारांचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:11+5:302021-06-16T04:29:11+5:30
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : ठेवीदारांचे ४५ लाख रुपये बुडवून पसार झालेल्या काष्टी येथील धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी व ...
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : ठेवीदारांचे ४५ लाख रुपये बुडवून पसार झालेल्या काष्टी येथील धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा ज्योती गवळी व रमेश गवळी या दाम्पत्यास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्यासह ठेवीदारांनी येथे अर्धनग्न आंदोलन केले.
या आंदोलनात भोस यांच्यासह डॉ. पांडुरंग दातीर, भानुदास राहिंज, बबनराव पाचपुते, अंबादास राहिंज, युवराज चिखलठाणे, आदी सहभागी झाले होते. गवळी दाम्पत्याने पतसंस्थेत ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एक वर्षापूर्वी सहायक निबंधक रावसाहेब खेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे संचालक मंडळ व सचिव यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, ज्योती गवळी व रमेश गवळी यांनी पुणे येथे नवीन व्यवसाय सुरू केल्याची चर्चा आहे. आरोपींना अटक करून ठेवीदारांचे पैसे मिळवून द्यावेत, या मागणीसाठी सोमवारी हे उपोषण करण्यात आले. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दोन दिवसांत आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगितले.
.................
फाेटो १४ श्रीगोंदा
ओळी- ठेवीदारांचे पैसे बुडवून पसार झालेल्या काष्टी येथील धनश्री पतसंस्थेची अध्यक्षा ज्योती गवळी व रमेश गवळी या दाम्पत्यास तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्यासह ठेवीदारांनी येथे अर्धनग्न आंदोलन केले.