वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:32+5:302021-04-05T04:19:32+5:30
तालुक्यातील घोटण, खानापूर व जायकवाडी बॅकवॉटर परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली ...
तालुक्यातील घोटण, खानापूर व जायकवाडी बॅकवॉटर परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्याचा साठा मुबलक आहे; परंतु वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे घोटण, खानापूर, गदेवाडी, कऱ्हेटाकळी, एरंडगाव या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिकाला फटका बसला आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे; परंतु प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व माजी कृषी अधिकारी रावसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली खानापूर येथील सब स्टेशनसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. दरम्यान, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लवकरच वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे तोंडी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. आगामी काही दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी केव्हाही पूर्वसूचना न देता मोठे आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
फोटो ०४ आंदोलन
खानापूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या देत भर उन्हात आंदोलन करण्यात आले.